अभिनेता सलामन खान याच्या घरावर झालेल्या गोळीबाराप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. रविवार, १४ एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यानंतर पोलिसांनी कसून तपास करत दोन दिवसांच्या आतच गुजरातच्या भुजमधून सागर पाल आणि विक्की गुप्ता या दोन्ही आरोपींना अटक केली. याप्रकरणी आता रोज नवनवी माहिती समोर येत असून अनेक महत्वाचे खुलासेही होत आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून या प्रकरणी वेगाने तपास सुरु आहे. गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत. पुढील तपासासाठी गुन्हे शाखेची चार पथकं नवी दिल्ली, बिहार, गुजरात आणि राजस्थान येथे पाठवली गेली आहेत. त्यातून या हल्ल्यासंदर्भातील आणखी धागेदोर मिळण्याची शक्यता आहे.
आरोपींना कसं पकडलं ?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींच्या पोलिसांनी गुजरातमधून मुसक्या आवळल्या. रविवारी पहाटे हल्ला झाल्यानंतर हे दोन्ही आरोपी तेथून लागलीच फरार झाले. मजल दरमल करत, कधी ट्रेन तर कधी बस अशा वाहनांतून प्रवेश करत ते गुजरातमध्ये पोहोचले. गोळीबाराची माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेन तपास सुरू केला. हल्लेखोरांना पकडण्यासाठी तब्बल पोलिसांची 20 पथकं तयार करण्यात आली होती. आरोपी हे मुंबईतील नसून इतर राज्यातील आहेत हे गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. या गोळीबाराचे एक सीसीटीव्ही फुटेज देखील पुढे आले. एका फुटेजमध्ये तर हल्लेखोरांचा चेहरा स्पष्ट दिसत होता. मात्र तरीही या हल्लेखोरांना पकडणे पोलिसांसमोर मोठे आवाहन नक्कीच होते.
सूत्रांनी दिलेल्या माहिती प्रमाणे फरार झाल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांचा फोन बंद ठेवला होता. मात्र ठराविक अंतर पार केल्यानंतर या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार अनमोल बिश्नोई याच्याशी बोलण्यासाठी आणि पुढचा प्लान ठरवण्यासाठी आरोपींनी फोन ऑन केला. इंटरनेट कॉलिंगद्वारे बिश्नोई हा सागर पाल आणि विक्की गुप्ता यांच्याशी थेट संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांनी त्याच्याशी बोलण्यासाठी फोन ऑन केला आणि तेव्हाच ते पोलिसांच्या रडावर आले. त्याच आधारे पोलिसांनी त्यांचं लोकेशन शोधलं आणि ते भुजमध्ये लपल्याचं निष्पन्न झाल्यानतंर तेथे जाऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या.
हल्लेखोर भुजच्या माता नु मढ मंदिरात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी भाविकांच्या वेशात मंदिरात प्रवेश केला. यावेळी हल्लेखोर विक्की गुप्ता आणि सागर पाल बेसावध होते, ते मंदिराच्या कोपऱ्यात झोपले होते. यावेळी पोलिसांनी या दोन्ही हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या. हल्लेखोरांना काही कळण्याच्या आतच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
फरार झाल्यानंतर बिश्नोई देत होत सूचना, लपण्याचं ठिकाणही त्यानेच निवडलं
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबार हल्ल्यानंतर आरोपींना लगेच लपण्यासाठी अनमोल बिश्नोईने मुद्दाम गुजरात आणि नंतर दक्षिणेकडील राज्य निवडले होते. बिष्णोई देत असलेल्या सूचनेनुसार आरोपी आरोपी गुजरातच्या दिशेने रवाना झाले होते.
सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा पोलिस हे पोलीस हरियाणा, पंजाब, दिल्ली आणि बिहारसारख्या प्रमुख ठिकाणी शोध घेतील, परंतु गुजरात आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये पोलीस शोध घेणार नाहीत, असा अमोल आणि आरोपींचा समज होता. पकडले जाऊ नयेत म्हणून दोन्ही आरोपी वाहतुकीचे वेगवेगळे मार्ग वापरत होते. ही देखील बिष्नोईचीच योजना होती. दोन्ही आरोपी इंटरनेट कॉलच्या माध्यमातून सातत्याने अनमोल बिश्नोई आणि आणखी व्यक्तीच्या संपर्कात होते असं चौकशीत समोर आलंय.
अनमोल बिश्नोईविरोधात पोलिस लुक-आऊट सर्क्युलर करणार जारी
या हल्ल्यासाठी दोन्ही आरोपींना शूटसाठी आधी 1 लाख रुपये दिले गेले होते. नंतर त्यांना आणखी 3 लाख रुपये देण्यात येणार होते, पण ते अद्याप मिळालेले नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. हल्लेखोरांन १३ एप्रिल रोजी गोळीबारासाठी शस्त्र पुरवण्यात आले होते, ते कोणी पुरवले त्यांचा शोध अद्याप सुरू आहे. याप्रकरणी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याचे नावही आरोपी म्हणून नोंदवण्यात आले. गोळीबारानंतर अनमोल बिश्नोईने फेसबुकवर पोस्ट करुन गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याने त्याला आरोपी म्हणून घोषित करण्यात आलं. सध्या कॅनडामध्ये असलेल्या अनमोल बिश्नोईविरोधात पोलिस लुक-आऊट सर्क्युलर जारी करणार आहेत अशी माहिती समोर आली आहे.