अभिनेता सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबाराला दहा दिवस उलटून गेले आहेत. रविवार, 14 एप्रिलला पहाटे सलमानच्या गॅलेक्सी येथील घरावर दोन शूटर्सनी गोळीबार केला. पोलिसांनी कसून तपास करत दोन दिवसांच्या आत गोळीबार करणाऱ्या दोन प्रमुख आरोपींना बेड्या ठोकल्याच, पण अजूनही तपास सुरू आहे. आरोपींच्या चौकशीतून रोज नवी माहिती मिळते. मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हल्ल्यापूर्वी शूटर्सनी सलमान खानच्या वांद्रे येथील घराची चार वेळा रेकी केली तर त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवरही एकद पाळत ठेवली बोती. मात्र कित्येक आठवडे सलमान त्याच्या फार्महाऊसला गेलाच नव्हता. त्यानंतरच आरोपींनी त्यांचा प्लान तयार करून घरावर गोळीबार करण्याची योजना आखण्यात आली.
याप्रकरणी अधिकाऱ्यांकडून कसून तपास सुरू आहे. गोळीबारासाठी वापरण्यात आलेल्या दोन्ही पिस्तुल सूरतमधील नदीत सापडल्या, त्यानंतर क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना आणखीन एक मोठं यश मिळालं. गुन्हे शाखेने आता आरोपींकडे असलेला फोनही शोधून काढला आहे. मात्र आरोपींनी तो फोन तोडला होता. आता गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी हा फोन फॉरेन्सिक टीमकडे पाठवून त्याचे कॉल आणि चॅट रेकॉर्ड तपासण्याची तयारी केली आहे. हा फोनही भुजमधूनच जप्त करण्यात आला.
दोन्ही पिस्तुल मिळाल्या
सलमानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाले आणि त्यांनी मजल दरमजल करत गुजरात गाठले. लपण्यापूर्वी त्यांनी शूटर्सनी दोन्ही पिस्तुल तापी नदीत फेकल्या होत्या. तापी नदीत ज्या ठिकाणी पिस्तूल फेकल्या, तेथे शोधमोहिम राबवून त्या दोन्ही पिस्तुल पोलिसांनी जप्त केल्या. नदीचं पाणी स्थिर असल्याने त्या पुढे वाहून गेल्या नाहीत, मात्र शूटर्सना या गोष्टीची कल्पना नव्हती. दोन दिवसांच्या झडतीत गुन्हे शाखेने 2 पिस्तूल, 4 मॅगझीन आणि 17 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. दोन्ही शूटर्सना गोळीबार करायचे आदेश होते. मात्र पकडले जाण्याच्या भीतीमुळे फक्त एकानेच गोळीबार केला होता.
लॉरेन्स बिश्नोईच्या अडचणी वाढल्या
क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनमोल आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या विरोधात भक्कम पुरावे सापडले आहेत. अशा स्थितीत दोघेही मुख्य सूत्रधार असून त्यामुळेच त्यांना मोस्ट वाँटेड आरोपी बनवण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे अधिकारी हे लॉरेन्सची चौकशी करण्याच्या तयारीत आहेत, तर अनमोलविरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली जाणार आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींवरही मोक्का लावण्यात येणार आहे.
गोळीबार प्रकरणातील दोन्ही आरोपींना गुजरातमधील भुज शहरातून अटक करण्यात आली होती. याप्रकरणी दोघांना न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सागर पाल याने अद्ययावत पिस्तुलाने सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. त्यानंतर दोघांनी विविध वाहनांतून प्रवास करत गुजरात गाठलं. या ठिकाणी येताच तापी नदीत त्यांनी पिस्तुल फेकून दिलं.
आरोपींना किती पैसे मिळाले?
सलमानला घाबरवण्यासाठी बिष्णोई गँगकडून हा गोळीबार घडवण्यात आला, त्यासाठी दोन शूटर्सना गोळीबाराची जबाबदारी देण्यात आली. यासाठी दोन्ही आरोपींना आधी एक लाख रुपये मिळाले होते, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. काम फत्ते झाल्यानंतर आरोपींना आणखी तीन लाख रुपये मिळणार होते. त्यापैकी आधी मिळालेल्या एक लाख रुपयांत आरोपींनी जुनी बाईक विकत घेतली. त्यासाठछी त्यांनी 24 हजार रुपये खर्च केले. तर पनवेलमध्ये राहण्यासाठी 10 हजार रुपये डिपॉझिट जमा करून दर महिना 3500 हजार रुपये भाडेतत्त्वावर घर घेतलं. यासाठी त्यांनी ओळखपत्र म्हणून खरे आधारकार्ड दिले होते. जवळपास 11 महिन्यांचा करार त्यांनी केला होता.