बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ माजली असून हे प्रकरण आता गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. याप्रकरणी आतापर्यंत तीन संसयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हल्लाप्रकरणात अनमोल बिश्नोईचे नाव समोर येत आहे. अनमोल बिश्नोईचे नाव यापूर्वी सिद्धू मूसवाला हत्या प्रकरणातही समोर आले होते. रविवारी पहाटेच्या सुमारास सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली आहे. हा अनमोल बिश्नोई कोण आहे आणि त्याने हा हल्ला नेमका का केला ते जाणून घेऊया.
रविवारी पहाटे बाईकवरून आलेल्या दोघांनी सलमान खानच्या घरावर गोळीबार केला आणि ते पळून गेले. तेव्हापासून सर्वत्र खळबळ माजली आहे. दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून अनमोल बिश्नोईने या गोळीबाराची, हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचे अंदाज वर्तवण्यात येत होते. तो लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे. हा शेवटचा इशारा आहे, अशी धमकी त्याने सलमानला एका मेजेजद्वारे दिली आहे.
काय लिहीलंय पोस्टमध्ये ?
एका पोस्टद्वारे सलमान खान याला धमकीवजा इशारा देण्यात आला आहे – आम्हाला शांतता हवी आहे. सलमान खान हा तर फक्त एक ट्रेलर होता. जेणेकरून तुला आमच्या ताकदीचा अंदाज येईल, आमच्या सामर्थ्याची आणखी चाचणी घेऊ नकोस. हा पहिला आणि शेवटचा इशारा आहे. यानंतर रिकाम्या घरावर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत आणि तुम्ही देव मानलेल्या दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांच्या नावाने आम्ही दोन कुत्रे पाळले आहेत. मला जास्त बोलायची सवय नाही. जय श्री राम, जय भारत. (लॉरेन्स बिश्नोई ग्रुप) गोल्डी ब्रार, रोहित गोधरा, कला जथेडी, असे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
कोण आहे अनमोल बिश्नोई ?
अनमोल बिश्नोई उर्फ भानू हा गायक सिद्धू मूसवाला प्रकरणात देखील आरोपी आहे. गेल्या वर्षी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते, मात्र यादरम्यान तो बनावट पासपोर्ट बनवून देशातून पळून गेला होता. तो बऱ्याचदा त्याचे स्थान बदलत असतो. गेल्या वर्षी तो केनियामध्ये स्पॉट झाला होता.
अपडेट्स काय ?
घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याच्या घरावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांपैकी एकाची ओळख पटल्याचे वृत्त आहे. गोळीबाराच्या वृत्तानंतर सलमान खानचे हितचिंतकही त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचले आहेत. बाबा सिद्दीकी, मनसे प्रमुख राज ठाकरे, तसेच सलमानचे भाऊ अरबाज खान आणि सोहेल खान, त्याचा पुतण्या अरहान खान आणि सलमानचा जवळचा मित्र राहुल कानाल सुपरस्टारला भेटण्यासाठी पोहोचले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनीही सलमान खानशी फोनवर चर्चा केली.