ब्रिजभान जैस्वार, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 19 डिसेंबर 2023 : अभिनेता सलमान खान याचा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्मा याच्या गाडीचा काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला. यामुळे एकच खळबळ माजली. मात्र आता या अपघातासंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या सांगण्यानुसार, आयुष शर्माच्या कारचा ॲक्सीडंट झाला तेव्हा तो कारमध्ये उपस्थितच नव्हता. तर त्यावेळी कारमध्ये आयुष याचा ड्रायव्हर, अरमान मेहंदी ( वय 31) केवळ तोच उपस्थित होता. या अपघातामध्ये अरमान हा गंभीर जखमी झाला असून आयुषच्या कारचेही मोठे नुकसान झाले आहे.
पोलिसांच्या सांगण्यानुसार, शनिवारी हा अपघात घडला. मात्र त्यावेळी आयुष शर्मा कारमध्ये उपस्थित नव्हता, फक्त त्याचा ड्रायव्हरच कार चालवत होता. तेव्हाच नशेत असलेल्या एका कारचालकाने समोरून आयुषच्या कारला जोरदार धडक दिली. परविंदरजीत सिंग असे आरोपी कारचालकाचे नाव असून अपघातावेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. अपघात झाल्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्याला अटक केली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान आयुष शर्मा याचा ड्रायव्हर अरमान हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. तसेच कारचेही बरेच नुकसान झाले. आयुष शर्मा याच्या कारचा अपघात झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती.
कोण आहे आयुष शर्मा ?
आयुष शर्मा हा बॉलिवूडमधील एक अभिनेता आहे, मात्र तरीही त्याची ओळख ही सलमान खानचा मेव्हणा अशीच जास्त आहे. सलमानची लहान बहीण अर्पिता खान हिचे आयुषशी लग्न झाले. 2018 मध्ये साली प्रदर्शित झालेल्या ‘लव्हयात्री’ सिनेमातून आयुषने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तसेच त्याने ‘अंतिम’ सिनेमात देखील सलमान खानसोबत काम केले. मात्र बॉक्स ऑफीसवर तो फारसा चालला नाही. अभिनेता म्हणून आयुष शर्मा अद्याप त्याची ओळख मिळवू शकलेला नाही.