कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा गेल्या कित्येक वर्षांपासून अभिनेता सलमान खानच्या मागे पडला आहे हे तर जगजाहीर आहे. लॉरेन्सने सलमानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत.एप्रिल महिन्यात त्याच्याच गँगच्या शूटर्सनी सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. तर नुकतीच सलमानचा जवळचा मित्र असलेल्या बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.यामुळे प्रकरण अतिशय गंभीर बनल असून सिद्दीकी यांच्या हत्येचा पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे. बाबा सिद्दीकींच्या मृ्त्यमुळे सलमान अतिशय हादरला असून सध्या त्याच्या सुरक्षेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. त्याच्या घराबाहेर 24 तास पोलिसांचा पहारा असून तिथे अक्षरश: छावणीचे स्वरूप आलं आहे. या हत्याकांडामुळे लॉरेन्स बिश्नोई पुन्हा चर्चेत आला आहे. याचदरम्यान सलमानची एक्स गर्लफ्रेंड हिने लॉरेन्सच नावाने सोशल मीडियावर थेट मेसेज पोस्ट केला असून तो तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली हिने सोशल मीडिया अकाऊंटवरून लॉरेन्स बिश्नोई याच्या नावे एक पोस्ट लिहीली आहे. त्याला लॉरेन्स भाई म्हणत, तिला त्याच्याशी झूम कॉलवरून संवाद साधायचा आहे, असेही तिने नमूद केलंय. राजस्थानच्या मंदिरात जाऊन पूजा करण्याची इच्छाही तिने व्यक्त केली आहे. एवढंच नव्हे तर सोमी अली हिने लॉरेन्सकडे त्याचा मोबाईल नंबरही मागितला आहे.
काय आहे सोमी अलीची पोस्ट ?
इन्स्टाग्रामवर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो शेअर करत सोमी अलीने एक पोस्ट लिहीली आहे. ‘ हा लॉरेन्स बिश्नोईला डायरेक्ट (थेट) मेसेज आहे. नमस्ते, लॉरेन्स भाई. मी असं ऐकलंय आणि पाहिलं देखील आहे की तुम्ही जेलमधून देखील झूम कॉल्स करत आहात. मलाही तुमच्याशी काही बोलायचं आहे. हे कसं करता येईल, ते प्लीज मला सांगा.
संपूर्ण जगात राजस्थान ही आमची आवडती जागा आहे. पूजा करण्यासाठी आम्हाला तुमच्या मंदिरात यायचं आहे. पण त्यापूर्वी तुमच्याशी झूम कॉलवरून बोलायचं आहे. हे बोलणं तुमच्याच फायद्याचं असेल याची निश्चिंती बाळगा. तुमचा मोबाईल नंबर दिलात तर खूप उपकार होतील. धन्यवाद.’ अशी पोस्ट सोमीने तिच्या अकाऊंटवर लिहीली आहे.
या पोस्टनंतर विविध चर्चांना उधाण आलं आहे. यावर युजर्सच्या विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. हे खूप चांगलंय असं एका युजरने लिहीलं. नंबर मिळाला एक इंटरव्ह्यू माझ्यासाठीही सेट कर अशी कमेंटही एकाने केली आहे.
बिश्नोई समाजाची माफी मागायला तयार होती सोमी
सोमी अलीने यापूर्वी सलमानवर मारहाण आणि फसवणुकीचा आरोपही केला आहे. ती अनेकदा त्याला शिव्या देताना दिसते. मात्र जेव्हा सलमानच्या घरावर गोळीबार झाला तेव्हा सोमीने त्यानंतर एक पोस्ट केली. सलमानच्या वतीने तो बिश्नोई समाजाची माफी मागण्यास तयार असल्याचे त्यात लिहिले होते.
जेलमध्ये लॉरेन्स बिश्नोई
राजस्थनामध्ये काळवीटाची शिकार केल्यावर सलमान खान हा लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर आला होता. त्याला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या आहेत. लॉरेन्स बिश्नोई सध्या तुरुंगात असून त्याच्या टोळीतील सदस्यांनी सलमानचा जवळचा मित्र असलेल्या बाबा सिद्दिकींची मुंबईत हत्या केली होती. जो सलमान सोबत असेल त्याचे हेच हाल होतील अशी धमकी त्याने दिली होती. यापूर्वी एप्रिल महिन्यात सलमानच्या वांद्रे येथील ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’वरही गोळीबार झाला होता. यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. तर गायक एपी ढिल्लनने सलमानसोबत काम केले तेव्हा बिश्नोई टोळीने त्याच्या कॅनडातील घराबाहेर गोळीबार केला.