‘…तर गाठ माझ्याशी’, भर पत्रकार परिषदेत संभाजीराजे भडकले, नेमकं काय घडलं?

| Updated on: Nov 06, 2022 | 4:57 PM

संभाजीराजे छत्रपती आज हर हर महादेव चित्रपटाची निर्मिती करणाऱ्यावर चांगलेच संतापले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला रोष व्यक्त केला.

...तर गाठ माझ्याशी, भर पत्रकार परिषदेत संभाजीराजे भडकले, नेमकं काय घडलं?
Follow us on

पुणे : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हर हर महादेव चित्रपटाची निर्मिती करणाऱ्यांवर निशाणा साधला. या पत्रकार परिषदेत संभाजीराजे चांगलेच आक्रमक झाले. या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला गेलाय, असा दावा संभाजीराजे यांनी केलाय. पुन्हा अशाप्रकारचे चित्रपट बनले तर खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा संभाजीराजेंनी दिलाय.

“जर यांनी असेच चित्रपट काढायला घेतले तर गाठ संभाजी छत्रपतीशी आहे. काढून तर बघुदेत. नाही आडवा आलो तर बघा. मीच आडवायला येणार. आमचा या घराण्यात जन्म होऊन उपयोग काय? वेळप्रसंग काहीही झालं तरी चालेल. पण असा चुकीचा इतिहास लोकांसमोर आणत असाल तर याद राखून ठेवा”, असा इशारा संभाजीराजेंनी दिला.

संभाजीराजे आणखी काय म्हणाले?

हे सुद्धा वाचा

“मला आज सांगायचंय की, ऐतिहासिक सिनेमे निघतायेत ते कौतुकास्पद आहे. पण चित्रपटाच्या स्वातंत्र्यानुसार इतिहासातील घडामोडींची मोडतोड केली जातेय. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाला चालणार नाही. हर हर महादेव हा चित्रपट जो प्रदर्शित झालाया त्यात इतिहासाची प्रचंड मोडतोड करण्यात आलीय”, अशी भूमिका संभाजीराजेंनी मांडली.

“इतिहास कुठे घेऊन जायचा, इतिहासाचा गाभा सोडून लोक जातायेत. तुम्ही चित्रपट काढता चांगली गोष्ट आहे. पण लोकांना आवडतंय म्हणून विपर्यास करून चित्रपट पुढे आणायचे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव म्हणतात आणि आपण इतिहासाचा विपर्यास करायचा?”, असा सवाल त्यांनी केला.

“वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटाचा पोश्टर बघा. हा काय पोशाख आहे? दिग्दर्शक महेश मांजरेकरांचा चित्रपट आहे. हा इतिहासाचा विपर्यास नाही का? या चित्रपटासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेले होते. मी सगळ्या प्रोड्युसरला इशारा देतो, असा चुकीचा इतिहास पुढे आणत असाल गाठ माझ्याशी आहे. मी स्वतः आडवा येणार”, असं संभाजीराजे म्हणाले.

“सिनेमॅटीक लिबर्टी, स्वातंत्र्य आहे म्हणून आपण काहीही करायचं? अहो भालजी पेंढारकरांचा आदर्श घ्या. आमची सुद्धा चूक आहे. आपल्या लोकांची देखील चूक आहे. आपण शिवाजी महाराजांची पुस्तकं वाचत नाहीयत. वा.सी.बेंद्रे, मेंधळे, जयसिंगराव पवार सर असतील, या लोकांनी इतिहास लिहिताना आयुष्य घालवलं. लोकांना नाट्यरुपांतर आवडतं म्हणून त्यामध्ये काहीही बदल करायचा?”, असा सवाल त्यांनी केला.

“चित्रपटाच्या पोश्टरमध्ये तुम्हाला पगडी दिसतेय का? पगडी काढणे म्हणजे किती चुकीचा संदेश आहे. माझी राज्य आणि केंद्र सरकार दोघांना विनंती आहे. तुम्हाला असे ऐतिहासिक चित्रपट काढायचे असतील तर तयार कराच. पण सेन्सॉर बोर्डवर ऐतिहासिक समिती निर्माण व्हायला पाहिजे. विशेष म्हणजे माझं नाव टाकलंय. संभाजीराजे आणि उदयनराजे यांचं सहकार्य आहे”, असं संभाजीराजे म्हणाले.

“चित्रपटात दत्ताजी पागे यांचा पोषाख बघा. मराठे आणि मराठी कुठून आले? पूर्वीचे मराठे म्हणजे आपण सर्वजण, सगळे अठरा पगड जात आणि बारा बलुतेदार. मराठा कधी जात नव्हती. हे यापुढे चालणार नाही आणि चालू देणार नाही. माझी सगळ्या मुलांना विनंती आहे, शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा”, असं आवाहन संभाजीराजेंनी केलं.