मुंबई : काही स्टार्स , अभिनेते असे असतात, ज्यांनी या जगाचा निरोप घेतला तरी त्यांचे शब्द, त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या कहाण्या आपल्याला नेहमी आठवतात. त्यांच्या अनेक किस्स्यांना पुन्हा उजाळा दिला जातो. असेच एक दिग्गज कलाकार, विनोदी अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणजे सतीश कौशिक (Satish Kaushik). त्यांचे निधन (death)होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. पण त्यांच्या स्मृती आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहेत. आज सतीश कौशिक यांची जयंती (Satish Kaushik Birth Anniversary) आहे.
गेल्या महिन्यात होळीच्या दुसऱ्या दिवशी, 9 मार्च रोजी सतीश कौशिक यांचे निधन झाले. आज त्यांची जयंती असते. सतीश कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी हरियाणातील महेंद्रगड येथे झाला. मोठे अभिनेते, दिग्दर्शक असूनही सतीश कौशीश हे अतिशय डाउन टू अर्थ व्यक्ती होते. लोकांमध्ये बसणे, त्यांच्याशी गप्पा मारणे, त्यांचे किस्से, समस्या ऐकणे आणि त्यांचे प्रश्न सोडवणे त्यांना आवडत असे. सतीश कौशिश यांना बॉलीवूडचे कॅलेंडर देखील म्हटले जाते. मिस्टर. इंडिया चित्रपटातील रोलवरून त्यांना हे नाव पडले होते. या अभिनेत्याच्या कॅलेंडरच्या भूमिकेसंदर्भात संबंधित एक किस्सा प्रसिद्ध आहे.
कॅलेंडर नाव कसे पडले ?
मिस्टर इंडिया या प्रसिद्ध चित्रपटाची स्टारकास्ट फायनल करताना सतीश कौशीक हे स्वतः ऑडिशन्स घेत होते. चित्रपटातील नोकर असलेल्या कॅलेंडरचे पात्र त्यांना खूप आवडले होते. त्या पात्राचे संवाद आणि विनोदी स्वभाव पाहून त्या व्यक्तिरेखेसाठी ऑडिशन देणारे अनेक लोक नाकारले जात होते. शेवटी जेव्हा या भूमिकेसाठी कोणालाचा फायनल करता आले नाही, तेव्हा सतीश कौशिक यांनी स्वतःच या भूमिकेसाठी ऑडिशन देण्यास सुरुवात केली.
कॅलेंडरचे हे पात्र किंवा भूमिका फार मोठी नव्हती, पण सतीश कौशिक ते काम करायला खूप उत्सुक होते. इतकेच नाही तर सतीश कौशिक यांनी या पात्राला कॅलेंडर असे नाव देण्यामागे खास कारण होते. खरे तर सतीश यांच्या वडिलांचा एक मित्र त्यांना भेटायला घरी यायचा तेव्हा ते, प्रत्येक गोष्ट कॅलेंडरशी जोडून सांगत असत. म्हणजेच, त्यांच्या प्रत्येक किस्स्याची, गोष्टी सुरूवात कॅलेंडरने व्हायची. याच व्यक्तिरेखेपासून प्रेरित असल्याने या चित्रपटातील सतीश कौशिक यांचे संवादही सारखेच आहेत. ते प्रत्येक संवादाच्या सुरुवातीला त्यांचे कॅलेंडर हे नाव घेत असत.
करीअर
सतीश कौशिक यांनी दिल्लीच्या करोलबागमध्ये आपलं शिक्षण घेतलं. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या करोडीमल कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. 1978मध्ये तिथून ते पास झाले आणि त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात शिक्षण घेतलं.
सतिश कौशिक यांनी आपल्या करीअरची सुरुवात जाने भी दो यारो या सिनेमातून केली होती. त्यानंतर त्यांनी 100हून अधिक सिनेमात काम केलं. 1993मध्ये त्यांनी रुप की रानी चोरों का राजा या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यानंतर त्यांनी डझनभर सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यांनी अनेक सिनेमांचीही निर्मिती केली. सतीश कौशिक यांचं वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी प्रत्येक प्रकारच्या भूमिका केल्या. मात्र, त्यांच्या विनोदी भूमिका अधिक गाजल्या. त्यांच्या विनोदी भूमिकांना तोड नव्हती.