बॉलिवूडचा किंग खान शाहरुख याचा आज 59 वा वाढदिवस आहे. 1992 मध्ये आलेल्या दीवानामधून त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. गेल्या 3 दशकांहून अधिक काळ बॉलिवूडवर अधिराज्य करणाऱ्या शाहरुखने एकाहून एक सरस चित्रपट दिले आहेत. शाहरुखने आपल्या चित्रपटांद्वारे देश-विदेशात केवळ नाव आणि प्रसिद्धीच मिळवली नाही तर रग्गड कमाईदेखील त्याने केली आहे. एकेका चित्रपटासाठी कोट्यवधींचं मानधन घेणाऱ्या शाहरुखकडे प्रचंड संपत्ती आहे. त्याचे नेटवर्थ किती आहे जाणून घेऊया.
शाहरुख खानची लाईफस्टाइल
किंग शाहरुख खानने अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत आणि लोकांच्या हृदयात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. त्याचे चित्रपट फक्त त्याच्या नावावर शेकडो कोटी कमावतात यावरून तुम्ही त्याच्या मजबूत फॅन फॉलोइंगचा अंदाज लावू शकता. शाहरुख त्याच्या चित्रपटातून भरपूर कमाई करतो.त्यामुळेच तो आज अतिशय आलिशान आयुष्य जगतो. त्याच्याकडे एक-दोन नव्हे तर भारतापासून परदेशात अनेक आलिशान घरे आहेत, आलिशान गाड्यांचा संग्रह आणि प्रचंड संपत्ती आहे.
जेव्हाही शाहरुख खानच्या घराची चर्चा होते तेव्हा लोकांच्या मनात सर्वप्रथम येते ती म्हणजे त्याची मन्नत. मुंबईतील वांद्रे भागात असलेल्या शाहरुखच्या घराचे नाव मन्नत आहे. या घराची किंमत अंदाजे 200 कोटी रुपये आहे, ज्यामध्ये बेडरूम आणि लिव्हिंग एरिया व्यतिरिक्त जिम, स्विमिंग पूल, पर्सनल ऑफिस, लायब्ररी, प्रायव्हेट मूव्ही थिएटर, ऑडिटोरियम, वॉक-इन वॉर्डरोब अशा अनेक सुविधा आहेत. शाहरुखचे हे ड्रीम होम त्याची पत्नी गौरी खानने स्वतः डिझाइन केले आहे.
पण शाहरुख खानकडे केवळ मन्नतच नाही तर देशात आणि जगात इतर अनेक ठिकाणी आलिशान बंगले आणि अपार्टमेंट्स आहेत. शाहरुखचा जन्म नवी दिल्लीत झाला. किंग खानचे बालपण दिल्लीतच गेले. तेथे दक्षिण दिल्लीत त्याचा भव्य बंगला आहे. तोही गौरी खाननेच डिझाईन केलाय. त्याशिवाय, रिपोर्ट्सनुसार, शाहरुखचा लंडनमध्ये आणि दुबईमध्ये पाम जुमेराह येथेही एक लक्झरी व्हिला आहे. दुबईच्या या भागात जगातील अनेक श्रीमंत लोक राहतात.
कार कलेक्शन
शाहरुख खानकडे अनेक लक्झरी कार आहेत. त्याच्या कलेक्शनमध्ये जगातील सर्वात महागड्या गाड्यांचा समावेश आहे. त्याच्या गॅरेजमध्ये रोल्स-रॉइस कलिनन, बेंटले कॉन्टिनेंटल जीटी, रोल्स-रॉइस फँटम ड्रॉपहेड कूप, रेंज रोव्हर स्पोर्ट, बीएमडब्ल्यू 7 सीरीज, बीएमडब्ल्यू 6-सीरीज कन्व्हर्टेबल, ऑडी ए8 एल, टोयोटा लँड क्रूझर, ह्युंदाई क्रेटा कारचा समावेश आहे.
किंग खान किती घेतो फी ?
फोर्ब्सच्या भारतातील सर्वाधिक मानधन घेतलेल्या अभिनेत्यांच्या यादीत शाहरुखच्याही नावाचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, ते एका चित्रपटासाठी 100 ते 120 कोटी रुपये घेतो. अनेक रिपोर्ट्समध्ये शाहरुख खानची फी 250 कोटी रुपयांपर्यंत असू शकते असा दावाही करण्यात आला आहे.
शाहरुख खान नेटवर्थ
जगभरात जबरदस्त फॅन फॉलोइंग असलेल्या शाहरुख खानचे नाव श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत सामील झाले आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 नुसार, किंग खानची एकूण संपत्ती सुमारे 7300 कोटी रुपये आहे. केवळ चित्रपटच नाही तर ब्रँड एंडोर्समेंट, आयपीएल, रेड चिलीज एंटरटेनमेंट हे प्रॉडक्शन हाऊस देखील त्याच्या उत्पन्नाचा स्रोत आहे. शाहरुख त्याच्या प्रोडक्शन हाऊसमधून दरवर्षी 500 कोटी रुपये कमावतो, तर केकेआर ही आयपीएलमधील त्याची टीम असून त्याद्वारे तो दरवर्षी 250 ते 270 कोटी रुपये कमवतो.