मुंबई : अभिनेता शरद केळकरने (Sharad Kelkar) अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय अभिनेत्यांसाठी डबिंग करत त्यांच्या भूमिकेसाठी आवाज दिला आहे. पण बाहुबली (Baahubali) या प्रसिद्ध चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी त्याने अभिनेता प्रभासच्या भूमिकेला आवाज दिला आणि त्याचे फॅन फॉलॉईंग खूप वाढले. यासंदर्भात खुद्द शरदनेच खुलासा केला. बाहुबलीचे दिग्दर्शक एसएस राजामौली (ss rajamouli)यांच्या पहिल्या मुलाखतीतच त्याची कशी छाप पडली, हेही अभिनेत्याने नमूद केले.
सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीदरम्यान शरदने सांगितले की, त्याचा आवाज हा प्रभासच्या भूमिकेसाठी अतिशय चपखल ठरेल याचा राजामौली यांना पहिल्याच भेटीत अंदाज आला होता.
मला वाटतं की राजामौली सर हे आपल्या इंडस्ट्रीतील सर्वात बुद्धिमान लोकांपैकी एक आहे. मी जेव्हा ऑडिशन दिली तेव्हा मला त्यांना भेटायची होती. आणि तेही मला भेटण्यास उत्सुक होते. मी त्यांना भेटण्यासाठी राजकमल स्टुडियोत गेलो होतो, असे शरदने सांगितले.
माझे व्यक्तिमतव प्रभासशी मिळते जुळते आहे, असे त्यांचे विश्लेषण होते. आणि मी एक अभिनेताही आहे, असेही त्यांना सांगण्यात आले होते. आवाजाचा जो आकार असतो, तो खूप महत्वपूर्ण असतो, असे शरदने सांगितले.
राजामौली सरांनी मला फक्त माझ्या आवाजामुळेच नव्हे तर माझ्या अभिनयामुळेही मला निवडलं असावं असं मत शरदने व्यक्त केलं. कारण जेव्हा एखादा अभिनेता व्हॉईस ओव्हरचे काम करतो, तेव्हा कुठे कोणता भाव आहे, संवादात कसा चढउतार करायचा हे त्याला माहीत असते, असे शरदने नमूद केले.
राजामौली सर जवळपास रोजच बाहुबलीच्या डबिंगसाठी उपस्थित असायचे, असेही शरद म्हणाला. बाहुबलीच्या दुसऱ्या भागाच्या डबिंगच्या वेळेस त्यांनी (राजामौली) माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला माझ्या बळावर काम करू दिले, अशी आठवण शरदने सांगितली.
पहिल्या भागात चांगलं (डबिंग) काम केलंय तर दुसऱ्या भागातही मी उत्तम काम करेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्याचे शरद म्हणाला.