बॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांचा मृत्यू झाला होता, त्यामुळ मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसला होता. त्यातच आता एका प्रसिद्ध गायकाला वडिलांच्या वियोगाचं दु:ख सहन करावं लागत आहे. प्रसिद्ध गायक-संगीतकार हिमेश रेशमिया याचे वडील आणि प्रसिद्ध संगीतकार विपिन रेशमिया यांचे निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विपिन रेशमिया यांच्या धीरूभाई रुग्णालयात उपचार सुरू होते. वाढतं वय आणि आजारपणाशी ते गेल्या काही काळापासून झुंजत होते. अखेर काल त्यांचं निधन झालं. वडिलांच्या जाण्यामुळे हिमेश रेशमियावर दु:खाचा डोंगर कोसळला असून बॉलीवूडमधून हळहळ व्यक्त होत आहे.
श्वास घेण्यास त्रास
रिपोर्ट्सनुसार, हिमेश रेशमियाच्या फॅमिली फ्रेंडने विपिन यांच्या निधनाच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. ‘ हो, गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता ‘ असे त्यांनी नमूद केले. विपिन रेशमिया यांच्या पार्थिवावर
19 सप्टेंबर रोजी जुहू येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. हिमेश हे आपल्या वडिलांना गुरूस्थानी मानायचे. वडील हेच माझ्यासाठी देव असल्याचेही एकदा हिमेश यांनी म्हटलं होतं. वडिलांच्या निधनामुळे त्याच्या शोकाला पारावर उरलेला नाही.
कोण होते विपिन रेशमिया ?
विपिन रेशमिया यांनी द एक्सपोज (2014) आणि तेरा सुरूर (2016) ची निर्मिती केली होती. त्यांनी इन्साफ का सूरज (1990) नावाच्या चित्रपटासाठी देखील संगीत दिले होते, मात्र तो रिलीजच झाला नाही. विपिन रेशमिया आणि सलमान खान एका चित्रपटात एकत्र काम करणार होते, असे हिमेश यांनी एकदा नमूद केलं होतं, तेव्हाच त्याची सलमानशी ओळख झाली. 1998 मध्ये रिलीज झालेल्या ‘जब प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटात सलमान आणि काजोलची भूमिका होती, हिमेशने या चित्रपटाला संगीत दिलं होतं. त्यानंतर त्याने सलमानच्या अनेक चित्रपटांसाठी म्युझिक दिलं, त्याची अनेक गाणी लोकप्रिय ठरली.