मुंबई | 3 फेब्रुवारी 2024 : प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे हिच्या निधनाच्या वृत्ताने शुक्रवारी सर्वत्र खळबळ माजली. अवघ्या 32 वर्षांच्या पूनमचं सर्व्हिकल कॅन्सरने निधन झाल्याची बातमी तिच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या टीमने शेअर केली. मात्र ही बातमी समोर येताच मनोरंजन क्षेत्रातील लोकांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला. अनेकांचा तर या बातमीवर विश्वासच बसेना.. तिचा मृत्यू नक्की कधी, कुठे झाला ? तिच्या कॅन्सरबाबत ती कोणाशीच बोलली नव्हती, काही दिवसांपूर्वीच्या तिच्या व्हिडीओमध्ये तर पूनम ठणठणीत दिसत होती. असं म्हणत अनेकांनी तिच्या मृत्यूच्या बातमीबाबत साशंकता व्यक्त केली आहे. अनेक सेलिब्रिटींना देखील ही न्यूज फेक अर्थात खोटी वाटत आहे. त्या लिस्टमध्ये प्रसिद्ध गायक राहुल वैद्य याचे नावही जोडलं गेलं आहे.
काय होती राहुल वैद्यची प्रतिक्रिया ?
राहुल वैद्यने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं आहे की, ‘पूनम पांडे गेली नाही ( मृत्यू झाला नाही) असं वाटणारी मी एकमेव व्यक्ती आहे का ?’ या पोस्टमुळे गायक राहुललाही पूनमचे निधन झाले यावर विश्वास बसत नसल्याचे दिसते. इतर लोकांप्रमाणे राहुल देखील ही बातमी स्वीकारू शकत नाहीये असं दिसतंय.
विनीत कक्कडलाही वाटत्ये बातमी फेक
केवळ राहुल वैद्यच नव्हे तर पूनमचा मित्र आणि माजी लॉकअप स्पर्धक विनीत कक्करनेही ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे. त्याने एक निवेदन जारी केले आहे की – “मला वाटतं की ही बातमी खोटी आहे. मी पूनमला ओळखतो, ती एक मजबूत मुलगी आहे. मी तिच्यासोबत लॉकअप शोमध्ये दोन आठवडे घालवले आहेत. मला तिचे व्यक्तिमत्त्व माहित आहे. ती खूप मजबूत मुलगी आहे.” असे म्हणत विनीतने तिच्या मृत्यूची बातमी खरी नसल्याचं म्हटलं आहे.
पूनम पांडेचं खरोखर निधन झालंय का असा प्रश्न अनेक सेलिब्रिटींना पडला. अभिनेत्री रोजलिन खान हिनेही त्यावर संशय व्यक्त केला होता. मला माहिती नाही की, पूनमबद्दल जी बातमी आलीये ती खरी आहे की, खोटी. जर हे खोटे असेल तर स्टंट करण्यासाठी गर्भाशयातील कॅन्सरला उपयोग केला जातोय, असं तिने नमूद केलं.
या सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली
एकीकडे काही लोकांना पूनमबद्दलच्या बातम्या फेक वाटत आहे. पण दुसरीकडे पूनमच्या मृत्यूबद्दल अनेक सेलिब्रिटींनी दु:ख व्यक्त केले. लॉकअप शोची होस्ट अभिनेत्री कंगना रनौतने पूनमच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पूनमचे इतक्या लहान वयात झालेले निधन धक्कादायक आहे, असे तिने पोस्टमध्ये लिहिले आहे. तसेच अभिनेत्री पूजा भट्टनेही पोस्ट करून अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली.