मुंबई | 27 जुलै 2023 : अमिषा पटेल (Ameesha Patel) आणि सनी देओल (Sunny Deol) या दोघांचाही गदर 2 (Gadar 2) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. 22 वर्षानंतर ‘गदर’चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार असून सर्वच त्यासाठी उत्सुक आहेत. बुधवारी गदर 2 चा ट्रेलर रिलीज झाला असून त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
या ट्रेलर लाँचसाठी अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल हे दोघेही तारा सिंग आणि सकिना यांच्याच लूकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी चित्रपटासंबंधी अनेक बाबी सांगितल्या. मात्र यावेळी अमिषाने एका धक्कादायक खुलासा केला, जे ऐकून सर्वच अवाक् झाले.
सनी देओलसोबत पिक्चरमध्ये काम करू नकोस, असं आपल्याला सांगण्यात आलं होतं, असा खळबळजनक खुलासा अमिषाने केला. ट्रेलर लाँचवेळेस अमिषाने ही गोष्ट सांगितली. इंडस्ट्रीतील काही बड्या लोकांनी मला गदर साइन करू नकोस असे सांगितले होते. ‘कहो ना प्यार है’पासून तू एका तरुणीची भूमिका साकारत असताना अचानक एका आईची भूमिका कशी साकारू शकते, असा प्रश्नही मला विचारण्यात आला होता, असे अमिषाने नमूद केले. पण अमिषाने हे आव्हान स्वीकारले आणि चित्रपट साइन केला.
गदर 2 मध्येही घेतले चॅलेंज
आता गदर 2 च्या वेळीही मी त्याच चॅलेंजचा सामना करत आहे, असं अमिषा पुढे म्हणाली. पण मला चॅलेंज पेलायला आवडतं आणि म्हणूनच मी सकीनाची भूमिका साकारण्यासाठी होकार दिला, असेही अमिषाने नमूद केलं.
‘गदर’ हा सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. इंडस्ट्रीतील अनेक लोक आणि वितरक या चित्रपटाच्या विरोधात होते आणि त्यांनी चित्रपटासाठी नकार दिला होता, पण नंतर चित्रपटाला जे प्रेम मिळालं, ते पाहून लोकांचा सूर बदलला, अशी आठवण सनी देओलने कपिल शर्मा शोमध्ये सांगितली होती.
अनिल शर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘गदर 2’ सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये आता तारा सिंग म्हणजेच सनी देओलच्या मुलाची कथा दाखवण्यात येणार आहे.