आलिया भट्ट आता गंगूबाई काठेयावाडच्या भूमिकेत दिसणार आहे. गंगूबाईची एक काळ मुंबईतल्या कामाठीपुऱ्यातल्या कुंटणखान्यावर जबरदस्त पकड होती. तिला मुंबईची पहिली महिला डॉनही म्हटलं जायचं. एवढंच काय तर, मुंबईचा पहिला अंडरवर्ल्ड डॉन करीमलालाला राखी बांधणारी, सेक्सवर्कर्सच्या हक्कांसाठी थेट पंतप्रधानांची भेट घेणारी म्हणून तिचं नाव होतं. कुंटणखान्यात काम करणाऱ्या महिलांमध्ये तिला आदराचं स्थान होतं. तिच्या जीवनावर आता सिनेमा बनतोय.
आलिया भट्ट आता गंगूबाई काठियावाडच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक आलियानं नुकताच आपल्या सोशल मीडिया साईटवरून पोस्ट केलाय. त्या दोन पोस्टर्सपैकी एकात ती परकर झबलं घालून बसलीय, तर तिच्या शेजारी एक पिस्तूल आहे. दुसऱ्या ब्लॅक अँड व्हाईट पोस्टरमध्ये भलंमोठं कुंकू लावलेली आलिया दिसते. संजय लीला भंसाळींसोबत आलियाचा हा पहिलाच सिनेमा. मुंबईतल्या रेड लाईट एरियामधली पहिली लेडी डॉन असा तिचा उल्लेख आढळतो. हा सिनेमा हुसैन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’वर बेतलाय.
कोण होती गंगूबाई काठेयावाड?
गंगा हरजीवनदास काठेयावाड असं गंगूबाईचं पूर्ण नाव. गुजरातमधल्या काठेयावाडमधल्या सधन आणि प्रतिष्ठित कुटुंबात तिचा जन्म झाला. तिच्या घरच्यांना तिला खुप शिक्षण देऊन मोठं झालेलं पहायचं होतं. पण, गंगूला बॉलिवुडचं भलतंच वेड. त्याच वेडापायी तिची वाताहतही झाली. तिच्या घरी कामाला आलेल्या रमणीकच्या ती नादी लागली. रमणीक काही काळ मुंबईला राहून आल्याचं तिला कळलं. रमणीकनंही गंगूला गळाला लावण्यासाठी मुंबई आणि बॉलिवुडबाबतची बरीचशी माहिती रंगवून सांगितली. त्यानंतर त्या दोघांमध्ये प्रेमाचे संबंध जुळले आणि रमणीकनं गंगूला मुंबईला पळवून आणली.
मुंबईला येताना गंगूनं तिच्या आईचे दागिने आणि पैसे सोबत आणले होते. जवळचे पैसे संपल्यानंतर रमणीकनं गंगूला आपल्या दोघांच्या राहण्याची व्यवस्था होईपर्यंत आपण माझ्या मावशीकडे रहायला जाऊ, असं सांगितलं. त्यानंतर एक वयस्कर स्त्री गंगूला घेऊन निघाली. त्या वस्तीत आल्यावर गंगूला कळलं की रमणीकनं तिला त्या वेश्येकडे 500 रुपयांत विकलंय. गंगूनं तिथून सुटण्याचा खुप प्रयत्न केला, धाय मोकलून रडली. मात्र, जेव्हा तिला कळलं की तिचे परतीचे सर्व मार्ग बंद झालेत तेव्हा तिने परिस्थितीला शरण जाण्याचा निर्णय घेतला. त्यामागे आणखीही एक कारण होतं. ती गुजरातमधल्या सधन आणि प्रतिष्ठित कुटुंबातून आलेली होती. आता या कुंटणखान्यातून परत जरी गेली तरी तिचं कुटुंब तिला स्वीकारेल का याची तिला शंका होती. त्यामुळे तिने मुंबईतच राहण्याचा निर्णय घेतला. अल्पावधीतच तीचं मोठं नाव झालं. दिसायला सुंदर आणि घरंदाज. त्यामुळे त्या कुंटणखान्यात येणारा प्रत्येकजण गंगूबद्दल विचारायचा.
अन् गंगूनं थेट करीमलालाच्या घरी जाऊन त्याला राखी बांधली!
सोळा वर्षाच्या गंगूवर एके दिवशी एका पठाणानं अत्याचार केला. तिला जागोजागी जखमा झाल्या. तोच पठाण पुन्हा आल्यावर तीनं त्याच्यासोबत जायला नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या पठाणानं तिला जबरदस्त मारहाण केली. या घटनेनंतर गंगूनं त्या पठाणाबद्दल माहिती काढली. तेव्हा तिला कळलं की तो पठाण तेव्हाचा मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन करीमलालासाठी काम करायचा. त्यानंतर गंगूनं थेट करीमलालाचं घर गाठलं. बराच काळ करीमलालाची बाहेर वाट पाहिल्यानंतर करीमलाला तिला भेटायला घराबाहेर आला. तिच्याशी घराबाहेर बोलणं त्याला प्रशस्त वाटेना तसंच तिला घरात घेणंही त्याला योग्य वाटेना म्हणून त्यानं गंगूला थेट घराच्या छतावर जाऊन बसायला सांगितलं.
करीमलालानं गंगूला खायला प्यायला बरंच काही पाठवलं. पण, करीमलाला येईपर्यंत गंगूनं कशालाही हात लावला नाही. तो आला तेव्हा गंगू त्याला म्हणाली, “मला रस्त्यावर बोलणं तुम्हाला योग्य वाटत नाही, घरामध्ये घेणंही योग्य वाटत नाही तर मग तुमच्या भांड्यांना हात लावून त्यांना अपवित्र का करू?” गंगूच्या या बोलण्यावरून करीमलाला ओशाळला. त्यानं तिला भेटायला येण्याचं कारण विचारलं, त्यावर तिनं त्या पठाणी गुंडाबद्दल करीमलालाला सांगितलं. त्यावर तो म्हणाला पुन्हा जेव्हा तो येईल तेव्हा मला कळव, मी त्याचा बंदोबस्त करेन.
करीमलालानं शब्द दिल्यानंतर गंगूबाईनं एक धागा त्याच्या मनगटावर बांधत त्याला म्हटलं, “मला आतापर्यंत कधीच कुठल्याच पुरुषासोबत इतकं सुरक्षित वाटलं नाही जितकं तुझ्यासोबत वाटलंय. त्यामुळे मी तुला ही राखी बांधतेय.” थेट करीमलालाच्या घरात जाऊन त्याला राखी बांधून यायची हिंमत गंगूनं केली होती. काही दिवसांनंतर जेव्हा तो पठाण पुन्हा आला तेव्हा करीमलालाच्या खबऱ्यांनी त्याला ती बातमी दिली. त्यानंतर स्वतः करीमलालानं कुंटणखान्यावर पोहोचून त्या पठाणाची धुलाई केली. भरवस्तीत त्याची धुलाई केल्यानंतर करीमलालानं जाहीर केलं की “गंगूबाई माझी बहिण आहे आणि तिचं काहीही बरंवाईट करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे.”
या घटनेनंतर गंगूबाईची परिसरात दहशत निर्माण झाली. त्यानंतर गंगूबाईनं घरातल्या ‘बाई’ची निवडणूक लढवली. बाई म्हणजे त्या घरातल्या वेश्यांची प्रमुख. घराच्या निवडणुकीनंतर तिने आसपासच्या इमारतींच्या ‘बाई’ची निवडणूक लढवली. ती निवडणूकही ती जिंकली आता ती गंगूपासून गंगूबाई बनली होती. सगळ्यांना तिचा धाक होता, सगळ्यांना माहित होतं ती करीमलालाची मानलेली बहिण आहे. कुंटणखान्याच्या परिसरात येणारे पुरुषही तिला टरकून असायचे.
असं म्हणतात, गंगूनं फसवून आणलेल्या मुलींना कुंटणखान्यात राहण्याची जबरदस्ती केली नाही. ज्यांना परत जायचं होतं त्यांना जाऊ दिलं. तसंच, अनेकींना उतारवयात जगण्याची तरतूद करून दिली. त्यामुळे तिचा फोटो वेश्या आपल्या खोलीत देवाच्या शेजारी लावत असल्याची आख्यायिका आहे.
असं म्हणतात, सेक्स वर्कर्सच्या हक्कांसाठी ती पंतप्रधानांच्या भेटीलाही गेली होती. काहीही असो, मुंबईच्या झगमगाटाचं स्वप्न पाहून मुंबईला पळून आलेल्या गंगा ते गंगू ते गंगूबाई काठेयावाडचं जीवन आलिया भट्ट उत्तमप्रकारे मोठ्या पडद्यावर साकारू शकेल हे निश्चित. गंगूबाई काठेयावड हा सप्टेंबरमध्ये रिलीज होतोय.
(ब्लॉगमधील मते लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)