मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : अभिनेता सनी देओल सध्या ‘गदर 2’ (Gadar 2) चित्रपटाचे भव्य यश एन्जॉय करत आहे. गदर 2 हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर धमाका करत असून लवकरच तो ५०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करेल. 22 वर्षांनी मोठ्या पडद्यावर आलेल्या तारा सिंहच्या रुपातून सनीने (sunny deol) प्रेक्षकांचे हृदय पुन्हा एकदा जिंकले. रक्षाबंधनाच्या सणानिमित्त बहिणींनी सनी देओलवर प्रेमाचा वर्षाव केला. सनी देओलने मुंबईतील एका शाळेत जाऊन रक्षाबंधनाचा सण आनंदाने साजरा केला.
सनी देओल याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये शाळकरी विद्यार्थिनी सनी याच्या मनगटावर राखी बांधताना दिसत आहेत. त्यांनी सनी देओल याला भाऊ मानत त्याचे औक्षण केले. मिठाईदेखील भरवली. तर काही मुलींनी त्याच्या पाया पडून आशिर्वादही घेतला. त्यांचा भाऊ बनलेल्या सनी देओलने मुलींवर प्रेमाचा वर्षाव केला आणि अनेक भेटवस्तूंचेही वाटप केले.
सनी देओलने असे साजरे केले रक्षाबंधन
खरंतर एका थिएटरमध्ये नुकतेच गदर 2 चे स्क्रीनिंग होते. चाहत्यांना सरप्राईज देण्यासाठी सनी देओल तेथे पोहोचला. त्याला समोर पाहून सर्व फॅन्स खूपच खुश झाले. काही तर आनंदाने नाचू लागले. सनी देओल याने तेथेही रक्षाबंधन साजरे केले. शाळकरी मुलींनीही त्याला औक्षण करत राखी बांधली. प्रेमाचा वर्षाव केला.
Every aspect of #RakhiCelebrationWithGadar2 is exceptional. Tara Singh’s bond with the NGO girls and the tied rakhi speaks volumes. pic.twitter.com/tNHvFuqpJB
— Jaat (@bluntJaat_) August 30, 2023
सनी देओलने चाहत्यांना दिली रक्षाबंधनाची भेट
दुसरीकडे, रक्षाबंधनाच्या निमित्ताने गदर 2 च्या निर्मात्यांनी चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. गदर 2 ची बंपर कमाई सुरू असतानाच, निर्मात्यांनी
रक्षाबंधनाच्या दिवशी चित्रपटाच्या तिकीटावर buy 2 get 2 ची ऑफर दिली आहे. याचा अर्थ फक्त भाऊ-बहिणीच नाही तर संपूर्ण कुटुंबासोबत सुट्टीच्या दिवशी गदर 2 पाहता येऊ शकतो. ही ऑफर २९ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत ठेवण्यात आली आहे.
सणाचा गदर 2 ला फायदा
सनी देओलचा चित्रपट गदर 2 हा चित्रपट गेल्या 19 दिवसांपासून चांगली कमाई करत आहे. वीकेंड आणि सुट्टीच्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत सनी देओलचा चित्रपट रक्षाबंधन आणि वीकेंडला पुन्हा एकदा चांगली कमाई करू शकतो, असे मानले जात आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाची एकूण कमाई 465.75 कोटी झाली आहे.