अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. ते विविध सामाजिक विषयांवर आपलं मत मांडत असतात. किरण माने यांनी नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केलीय. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. किरण माने यांनी एका नाटकाच्या प्रयोगादरम्यानची आठवण या पोस्टमध्ये सांगितली आहे. अभिनेत्री अमृता सुभाष हिच्यासोबत किरण माने यांनी ‘परफेक्ट मिसमॅच’ हे नाटक केलं होतं. या नाटकाच्या प्रयोगावेळी स्टेजवर अचानकपणे उंदीर आला आणि धांदल उडाली. तेव्हा प्रसंगावधान दाखवल्याने कशी विनोद निर्मिती झाली आणि प्रेक्षकांमध्ये हशा पिकला याबाबत किरण माने यांनी पोस्ट शेअर केलीय.
आठ वर्षांपुर्वीची भन्नाट आठवण…
…बेकार फजिती झाली असती राव त्यावेळी. ‘परफेक्ट मिसमॅच’ नाटकाचा ठाण्यात गडकरीला प्रयोग होता. धुलीवंदनाची सुट्टी होती. जवळजवळ फुल्ल भरलेलं थिएटर.. प्रयोगही छान रंगू लागला. मी गावाकडचा सातार्याचा रांगडा गडी. जुन्या बिल्डींग्ज पाडणारा ब्रेकींग काॅन्ट्रॅक्टर आणि अमृता पुण्यातली हायफाय मुलगी. दोघेही एकमेकांना ‘परफेक्ट मिसमॅच’ !
अमृता रात्रीच्या निवांत वेळी ‘चांदणं पहायला’ टेरेसवर येते. तिच्या लक्षात येतं की टेरेसला लागून असलेल्या स्टोअररूममध्ये मी कुमार गंधर्वांचा नंद राग ऐकत स्काॅच पित बसलोय. माझी रांगडी-गावठी पर्सनॅलिटी आणि कुमारजी-स्काॅच हे विचित्र काॅम्बीनेशन पाहून ती चकीत होते. गप्पा मारायला बसते. बोलता-बोलता पेग भरून घेते. आणि गप्पा रंगत जातात. पेगवर पेग रिचवले जातात. दोघेही फुल्ल टल्ली होतो. असा सीन मस्त रंगात आला. हशा-टाळ्या सुरू होत्या.
एका क्षणी प्रेक्षकांतून वेगळीच कुजबूज ऐकू येऊ लागली. काही स्त्रियांच्या ‘ईईS’ अशा बारीक किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या. सीनमध्ये जे सुरू होते, त्याला हा अगदीच ‘ऑड’ रिस्पाॅन्स होता. आम्ही दोघेही किंचीत काॅन्शस झालो. पण बेअरींग सोडले नाही. प्रतीक्षिप्त क्रियेनं आमचे कपडे ठिकठाक आहेत का हे आधी चेक केलं…! हुश्श !! ठीक होते. मग काय झालेय???
प्रेक्षकांतले आवाज वाढू लागले. मी त्याच बेअरींगमध्ये इकडे तिकडे पाहीलं…तर एक भला मोठ्ठाच्या मोठ्ठा उंदीर स्टेजवर आला होता… आणि त्याची नजर आमच्या सीनमध्ये ठेवलेल्या ‘चखण्या’वर होती. हळूहळू तो त्या दिशेने येत होता.
अमृताची त्या उंदराकडे पाठ होती. तिने बेअरींग न सोडता नजरेनेच मला ‘काय झाले?’ असे विचारले. मी त्याच टल्ली अवस्थेत उंदराला म्हणालो “ये ये भावा.. तुझीच कमी होती. खा चखना”.. अमृताही बेअरींग न सोडत क्षणार्धात म्हणाली “अरे आपल्याला कंपनी द्यायला हासुद्धा आला.” प्रेक्षकांतून बंपर लाफ्टर आला. उंदराने बिचार्याने घाबरून विंगेत एक्झीट घेतली. मी परत अमृताकडे वळत “धुलवड साजरी करायला आला आसंल” असं म्हणत सीन पुन्हा सुरू केला…
सीनही ‘लाईट’ मूडचा असल्यामुळे वेळ निभावून गेली आणि पुढे नाटक भन्नाट पार पडलं पण त्यावेळी अमृता आणि मी दोघांच्याही पोटात गोळा आला होता हे मात्र खरं… वाईट फजिती होऊन अख्ख्या प्रयोगाची वाट लागली असती तर’ या जाणीवेनं अजून अंगावर काटा येतो!
– किरण माने.