…तेव्हा वाटलं विठ्ठलानेच साद घातली; संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट चर्चेत

| Updated on: Jul 17, 2024 | 7:47 PM

Sankarshan Karhade Post About Ashadhi Ekadashi : अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने एक पोस्ट नुकतंच शेअर केली आहे. यात त्याने आषाढी एकादशी, उपवास आणि नाटकाचा दौरा यावर भाष्य केलं आहे. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याच्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होत आहे....

...तेव्हा वाटलं विठ्ठलानेच साद घातली; संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट चर्चेत
संकर्षण कऱ्हाडे, अभिनेता
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा सध्या परदेशात आहे. ‘संकर्षण via स्पृहा’ या कार्यक्रमाच्या प्रयोगानिमित्त संकर्षण कऱ्हाडे सध्या अमेरिकेत आहे. ‘संकर्षण via स्पृहा’ या कार्यक्रमाचे प्रयोग अमेरिकेतील विविध शहरांमध्ये होणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्त परदेशात असताना संकर्षण कऱ्हाडेंचं मन मात्र भारतात आणि विशेषत: पंढरपुरात आहे. त्याचं कारणही विशेष आहे, कारण आज आहे आषाढी एकादशी… आजच्या दिवशी अनेकजण उपवास करतात तसंच आपणही उपवास करावा, असा विचार संकर्षणच्या मनात सुरू असतानाच अशी एक घटना घडली की संकर्षणला वाटतं की, विठ्ठलानेच साद घातली आहे…

नेमकं काय घडलं?

‘संकर्षण via स्पृहा’ कार्यक्रमाच्या प्रयोगानिमित्त संकर्षण कऱ्हाडे सध्या अमेरिकेत आहे. 12 जुलै पासून ते 28 जुलैपर्यंत या अमेरिकेतील विविध शहरांमध्ये ‘संकर्षण via स्पृहा’ कार्यक्रमाचे प्रयोग होणार आहेत. आज अॅस्टिनमध्ये ‘संकर्षण via स्पृहा’चा प्रयोग होता. तेव्हा हा प्रयोग बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी खास कार्यक्रम आयोजित केला होता. पांडुरंगाची पूजा आणि दिंडीचं आयोजन केलं होतं. या पूजेचा मान संकर्षण कऱ्हाडे याला देण्यात आला. यावेळी भरून पावल्याची भावना संकर्षण कऱ्हाडेच्या मनात होती. याबाबत त्याने एक पोस्ट शेअर केलीय.

संकर्षणची पोस्ट जशीच्या तशी

ह्या वर्षीच्या आषाढी एकादशीला भारतात नाहीये…
सारखं मनांत वाटत होतं कि
“दर्शन कुठे घ्यावं… ??? ऊपवास कसा करावा ??? …”
पण अमेरिकेत प्रयोग करायला आलो Austin मध्ये … आणि तिथल्या मंडळाने प्रयोग सुरु करायच्या आधी विचारलं कि ;
“आम्ही दर वर्षी पांडूरंगाची पूजा करतो , दिंडी आयोजीत करतो… तर तुम्ही पुजेचा मान घ्याल का ….?”
मला असं वाटलं कि ,
विठ्ठलानेच साद घातली ….

“विठ्ठलाची हाक जोवर वैंकुठातून येत नाही..
कित्तीही ठरवा तुम्ही , पाऊल पंढरीकडे जात नाही..
लाख्खो पाऊलं चालून , जेंव्हा भेट ऊराऊरी होते..
पांडूरंग करतो स्वागत , आणि तेंव्हा खरी वारी होते…”

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ….!!!!

विविध माध्यमात संकर्षणचं काम

‘संकर्षण via स्पृहा’ कविता आणि गप्पांचा कार्यक्रम आहे. यात अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी हे दोघे कविता सादर करत असतात. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. सध्या या कार्यक्रमाचे अमेरिकेत प्रयोग होत आहेत. संकर्षण कऱ्हाडे हा सध्या विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नियम व अटी लागू हे त्याचं नाटक सुरु आहे. ड्रामा ज्युनिअर्स या झी मराठीवरील रिअॅलिटी शोमध्ये तो परीक्षक म्हणून दिसतो आहे. तर संवाद साधताना हा अभिनेत्री शिवानी रांगोळेसोबतचा त्याचा नवा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.