‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेची गोष्ट जरा हटके आहे. चार बहिणी आणि त्यांचा लाडका भाऊ… बहिणींच्या सुखासाठी वाट्टेल ते करणारा त्यांचा लाडका दादा… या मालिकेतील कथा वेगळी असली तरी या दादाच्या आयुष्यात एक राजकुमारी आहे. ती म्हणजे तुळजा. अभिनेत्री दिशा परदेशी ही तुळजाची भूमिका साकारत आहे. या भूमिकाविषयी दिशा बोलती झाली. ही भूमिका करताना अतिशय आनंद झाल्याचं दिशा परदेशीने सांगितलं आहे. तसंच तिच्या वैयक्तिक जीवनाबाबतही तिने प्रतिक्रिया दिली आहे.
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत दिशा परदेशी ‘तुळजा’ ची भूमिका साकारत आहे. या भूमिकेबद्दल आणि आपल्या खाजगी आयुष्याबद्दल दिशा बोलती झाली. तुळजा एक सुंदर, सुशील डॉक्टर आहे, स्वभावाने प्रामाणिक आणि अभ्यासात अतिशय हुशार आहे. इतर मुलींना ही अभ्यासासाठी प्रोत्साहित करते. तिला वाटतं की मुलगी शिकली तरच तिची प्रगती होईल आणि ती स्वतःच अस्तित्व ह्या जगात निर्माण करू शकेल. ती नम्र, सर्वांचा आदर करणारी आणि समजूतदार आहे पण गरज पडली तर आरे ला कारे करणारी आहे, असं दिशा म्हणाली.
तुळजा ही श्रीमंत घरातली मुलगी आहे. तुळजाच्या घरात तिचे बाबा, मोठा भाऊ , लहान भाऊ आहेत सगळ्यात वेगळी गोष्ट म्हणजे तिच्या दोन आई आहेत. तिचे बाबा आणि मोठा भाऊ कडक शिस्तीचे आहेत. तुळजा लहानपणापासून अभ्यासात चांगली असल्याकारणाने घरच्यांनीच निर्णय घेतला की तिला डॉक्टर बनवायचं म्हणून तिला गावाबाहेर पुणे शहरात एम.बी.बी.एस ची तयारी करायला पाठवतात, असं म्हणत दिशाने ‘तुळजा’च्या स्वभावातील गुण सांगितले.
तुळजा भूमिका माझ्यापर्यंत येण्याचा किस्सा सांगायला आवडेल मला. मागच्या वर्षी मी माझ्या ‘मुसाफिरा’ मराठी चित्रपटाच्या शूटिंगसाठी स्कॉटलंडला गेले होते. चित्रपटाचं प्रोमोशन चालू झालं. चित्रपट प्रदर्शित झाला आणि मला एके दिवशी वज्र प्रॉडक्शन कॉल आला. त्यांनी म्हटलं की, ‘मुसाफिरा’ चित्रपटात तुम्हीच काम केलं आहे ना? नवीन मालिका येत आहे. जी झी मराठीवर प्रसारित होणार आहे. आम्ही मालिकेच्या हेरॉईनसाठी तुमचा विचार करत आहोत. मला ही गोष्ट आणि माझी भूमिका ऐकून खूप वेगळी वाटली, आणि असा सुरु झाला तुळजाचा प्रवास. मला आनंद आहे की झी मराठी सारख्या इतक्या मोठ्या वाहिनीसोबत मी काम करत आहे, असं म्हणत मालिकेत भूमिका मिळण्यासाठीचा प्रवास दिशाने सांगितला.