‘बिग बॉस मराठी’ आणि त्यातील स्पर्धकांची जोरदार चर्चा आहे. ‘गुलिगत’ फेम सूरज चव्हाणलाही प्रचंड प्रेम मिळत आहे. मराठी कलाकारांकडून त्याला पाठिंबा मिळतोय. बिग बॉस मराठीच्या आधीच्या सिझनमधील स्पर्धकांनीही सूरज चव्हाणला पाठिंबा दिला आहे. उत्कर्ष शिंदे, पुष्कर जोग या बिग बॉस मराठीच्या आधीच्या सिझनमधील स्पर्धकांनी सूरजला पाठिंबा दिला आहे. तसंच बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनची विजेती अभिनेत्री मेघा धाडे हिनेही सूरजला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस सूरज चव्हाणला पाठिंबा वाढत चालला आहे.
गायक आणि अभिनेता उत्कर्ष शिंदे याने एका मुलाखतीत सूरज चव्हाणविषयी भाष्य केलं. त्याने सूरजला आपला पाठिंबा दिला आहे. उत्कर्षच्या या व्हीडिओवर अभिनेत्री मेघा धाडे हिने कमेंट केली आहे. त्याचं नाव सूरज आहे. तो नक्की चमकेल, असं मेघा धाडे म्हणाली. तिच्या या कमेंटला नेटकऱ्यांनी पसंती दिलीय.
एका मुलाखती दरम्यान उत्कर्ष शिंदेने सूरज चव्हाण याच्याबाबत त्याचं मत मांडलं आहे. मी अख्ख्या महाराष्ट्राला सांगेन की सूरजला खूप मतदान द्या. मला खूप राग येतो. कारण सारखं कुणीतरी त्याला हिणवत असतं. कुणीतरी कमी लेखत असतं. घरातील कामांमध्ये पण त्याच्यावर अन्याय होतो. दोन- दोन वेळेला तो भांडी घासत असतो. पण त्याला भांडी का नेहमी घासायला लावतात. तोच का नेहमी टेबल पुसताना दिसतो. त्यालाच का बूट उचलायला लावता? का?, असं उत्कर्ष शिंदे याने म्हटलं आहे. त्याच्या या विधानाची चर्चा होत आहे.
उत्कर्ष शिंदेच्या या व्हीडिओवर बिग बॉसच्या पहिल्या सिझनमधील स्पर्धक पुष्कर जोग याने कमेंट केली आहे. सूरज चव्हाण फार साधा माणूस आहे. त्याला गेम कळत नाही पण पण तो खरा आहे. त्याला माझा पाठिंबा आहे, असं पुष्कर म्हणाला आहे. सूरज चव्हाणला मराठी कलाकारांचा पाठिंबा मिळतोय. नेटकरी देखील त्याला पाठिंबा देत आहेत. सोशल मीडियावर सूरजच्या समर्थनार्थ पोस्ट पाहायला मिळत आहेत.