काकू म्हणाल्या, मुलगी झाली तर तिचं नाव ‘श्रेया’ ठेवेन…; श्रेया बुगडेची पोस्ट चर्चेत

| Updated on: Jun 24, 2024 | 4:22 PM

Actress Shreya Bugde on Drama Juniors : 'ड्रामा जुनिअर्स' या नव्या कार्यक्रमातून अभिनेत्री श्रेया बुगडे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाची सुरुवात करताना श्रेया बुगडेने खास पोस्ट शेअर केलीय. यात तिने एका महिला प्रेक्षकासोबतचा अनुभव शेअर केलाय. वाचा सविस्तर...

काकू म्हणाल्या, मुलगी झाली तर तिचं नाव श्रेया ठेवेन...; श्रेया बुगडेची पोस्ट चर्चेत
श्रेया बुगडे, अभिनेत्री
Image Credit source: Instagram
Follow us on

झी मराठीवर ‘ड्रामा जुनिअर्स’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमात अभिनेत्री श्रेया बुगडे देखील असणार आहे. श्रेया ‘ड्रामा जुनिअर्स’चं सूत्रसंचालन करणार आहे. या नव्या इनिंगबद्दल श्रेयाने एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक जुना किस्सा सांगितला आहे. सूत्रसंचालक म्हणून आता माझी जबाबदारी वाढली आहे. एकदा प्रेक्षकातल्या एक काकू सहज बोलता-बोलता म्हणाल्या “मला जर मुलगी झालीना तर तिचं नाव मी ‘श्रेयाच’ ठेवेन. तुझ्या सारखीच होऊदे पोर माझी” मला एवढं धस्स’ झालं होत त्या दिवशी, बापरे…! पुढे त्या काकूंना ‘श्रेया’ झाली का ‘श्रेयस’ ते काही मला कळलं नाही पण माझी मात्र जबाबदारी वाढली, असं श्रेयाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नव्या कार्यक्रमाबद्दल श्रेया काय म्हणाली?

मला लहान मुलं खूप आवडतात तर त्यांच्याबरोबर जुळून घेणं माझ्यासाठी कठीण नसेल. त्यांच्या वयाचं होऊन जर त्यांच्या बरोबर मैत्री केली तर ते जास्त ओपन-अप होतील. आजच्या तरुण प्रतिभाशाली मुलांवर, सोशल मीडियाचा प्रभाव आहे. ह्या मुलानं मधलं टॅलेंट वाया न जाता उत्तम दर्जेदार परफॉर्मेन्सस मंचावरती प्रदर्शित करणे फार गरजेचं आहे आणि सातत्याने झी मराठी ती कामगिरी वर्षानुवर्षे करत आहे, असं श्रेया बुगडे म्हणाली.

तेव्हा मी लहान होते- श्रेया

आमची सर्वात लहान स्पर्धक आहे ती साधारण साडेतीन-चार वर्षाची आहे. मी जेव्हा कामाला सुरवात केली तेव्हा मी आठ वर्षाची होते. मी त्यांच्यातलीच एक आहे असं मला वाटत, कारण मी ही ह्याच वयात आपल्या कामाची सुरवात केली होती. अर्थात तेव्हा आम्हाला इतक्या सुविधा नव्हत्या आमच्या आणि आमच्या पालकांच्या संघर्षाची पद्धत वेगळी होती. पण काळ बदलला आहे आणि स्पर्धकांच्या कलेला अशी संधी मिळणं खूप महत्वाचं आहे, असंही श्रेयाने सांगितलं.

मी अनेक भाषांमध्ये काम केले आहे आणि त्यातून मी हेच शिकले की नवीन गोष्टी कश्या शिकता येतील आणि त्यांचा वापर पुढच्या कामामध्ये कश्या प्रकारे करता येईल. माझ्या अनुभवामधून मी हेच सांगेन की प्रत्येक वेळेला आपण जेव्हा काम करतो, तेव्हा आपण जागृत असलं पाहिजे. त्यातून अनेक गोष्टी शिकता आणि अनुभवता येतात फक्त कलाकार म्हणूनच नाही तर एक व्यक्ती म्हणून सुद्धा. नेहमी प्रचंड मेहनत करण्याची तयारी आणि मनोबल असलं पाहिजे. प्रसिद्धी,पैसे ह्यांच्याकडे लक्ष न देता कलाकार आणि माणूस म्हणून जास्तीत जास्त कसं स्वतःला घडवता येईल ह्याकडे लक्ष दिले पाहिजे, असंही श्रेया म्हणाली.