‘पारू’ ही झी मराठीवरील मालिका सध्या लोकप्रिय ठरत आहे. याच मालिकेतील पारू आणि आदित्यसोबत अक्कलकोटमध्ये ‘होम मिनिस्टर’चा विशेष भाग रंगला आहे. श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमध्ये होम मिनिस्टरचा ‘पारू’ विशेष भाग शूट झाला आहे. या विशेष भागात अनेक किस्से आणि धम्माल, मज्जा-मस्ती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 27 मे संध्याकाळी 6.30 वाजता हा एपिसोड प्रसारित होणार आहे. झी मराठी वाहिनी एका नवीन रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. झी मराठीचं हे नवीन रूप 27 मे 2024 उलगडणार आहे. याच खास दिवसानिमित्त ‘होम मिनिस्टर’चा विशेष भाग प्रसारित होणार आहे.
झी मराठी एका नवीन रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. हे नवीन रूप 27 मे 2024 या दिवशी प्रेक्षकांसमोर येणार आहे. नवीन गोष्टीची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने केली जाते. म्हणूनच महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर पोहचले अक्कलकोटला ‘श्री स्वामी समर्थ मंदिरात’…. स्वामींच्या मंदिरात ३०,००० सोनचाफ्याच्या फुलांची आरास केली गेली होती. आदेश भाऊजी आणि पारू टीमने मिळून स्वामींची आरती करून स्वामींपुढे नवीन वाटचालीसाठी प्रार्थना केली आणि आशिर्वाद घेतलं. यावेळी पारू आणि आदित्यसोबत होम मिनिस्टर पैठणीचा खेळ रंगला.
या खास एपिसोडविषयी आदेश बांदेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. खरंतर, अक्कलकोट पुण्यभूमी आहे. माझ्या घरात स्वामी भक्ती 24 तास सुरूच असते. मग त्यात पारायण असो किंवा सुचित्राची पारायणासोबत नित्य पूजा असो. त्यातून अक्कलकोटला जेव्हा जेव्हा जातो त्यावेळी अशक्य ही शक्य करतील स्वामी याची नेहेमी प्रचिती येते. त्या वातावरणात ते चैतन्य अनुभवत असताना बहरणाऱ्या नात्यांच्या 20 वर्षाच्या प्रवासामध्ये होम मिनिस्टरच्या माध्यमातून मी अनेक वर्ष अक्कलकोटला जात आहे.पण यावेळी एक वेगळाच अनुभव आहे, असं आदेश बांदेकर म्हणाले.
स्वामींच्या मंदिरात त्यांना आवडणाऱ्या सोनचाफ्याच्या फुलांची आरास झी मराठीने केली. यासाठी ३०,००० सोनचाफ्याची फुलं वापरण्यात आली. ती आरास अनुभवत असताना एक वेगळंच चैतन्य होत. मी जेव्हा स्वामींची आरती करत होतो तेव्हा माझ्या डोळ्यात आनंदाश्रू कधी आले मला कळलेच नाही. भारावून टाकणारं वातावरण होतं. मी शब्दात हा अनुभव पूर्णपणे व्यक्त करू शकणार नाही. त्यानंतर अन्नछत्रमध्ये गेलो तिथे भाविकांचा आनंद आणि त्यांचा आशीर्वाद मिळाला आणि पुन्हा आपण लोकांच्या घरात वारी करू ती नाती घट्ट करू, बहरू आणि सुगंध नात्याचा असाच दरवळत राहूदे अश्या भावना उराशी बांधून मी तिथून बाहेर पडलो, असं आदेश बांदेकरांनी सांगितलं.
‘पारू’ मालिकेतील पारू आणि आदित्य हे देखील यावेळी उपस्थित होते. ‘पारू’ म्हणजेच म्हणजेच अभिनेत्री शरयू सोनावणेने आपला आनंद व्यक्त केला. मी झी मराठीचे खूप आभार मानते की त्यांच्यामुळे मला अक्कलकोटला जायची संधी मिळाली आणि स्वामींच्या पादुकांना स्पर्श करायला मिळाले. चाफ्याच्या फुलांची भव्य आणि आकर्षक सजावट पाहून डोळे दिपून गेले होते. यासोबतच ‘होम मिनिस्टर’ मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. मला स्वामींचे इतके सुंदर दर्शन या निमित्ताने करता आले, ते ही इतक्या महत्वाच्या दिवशी…, असं शरयू म्हणाली.