मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय बिग बॉस या शोच्या 16 व्या हंगामाचा फिनाले रविवारी 12 फेब्रुवारीला पार पडला. पुण्याचा हस्तीचा बस्ती असलेला रॅपर एमसी स्टॅन हा विजेता ठरला. तर मराठमोळा शिव ठाकरे याला उपविजेता पदावर समाधान मानावं लागलं. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या हंगामाचा शिव ठाकरे हा विजेता ठरला होता. यानंतर बिग बॉसच्या 16 व्या सिजनचाही विजेता शिव ठाकरे व्हावा, अशी उभ्या महाराष्ट्राची इच्छा होती. त्यासाठी शिव ठाकरे याच्या मुळगावी अमरावतीत ठिकठिकाणी होमहवन करण्यातं आलं. मात्र शिव ठाकरे हा विनर न ठरल्याने नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बिग बॉसच्या अंतिम फेरीत एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे हे दोघे पोहचले. सलमान खान याने हात उंचावत स्टॅन बिग बॉस असल्याचं जाहीर केलं. अनेकांना आशा होती की शिव ठाकरे हाच बिग बॉस ठरेल. मात्र एमसी स्टॅन विजेता ठरल्याने शिवच्या चाहत्यांचा हिरमोड झाला.
शिवसोबत अन्याय झाला, त्याच्यासोबत पक्षपातीपणा करण्यात आल्याचं नेटकऱ्यांचं मत आहे. शिव ठाकरे उपविजेता ठरल्याने बिग बॉस या शोलाच नेटकऱ्यांनी ट्रोल केलं.
शिव ठाकरे अंतिम फेरीत पोहचला होता. शिव याच्या डोक्यावर बिग बॉसचा ताज पाहण्यासाठी अनेक अभिनेत्यांनी, राजकीय नेत्यांनी सोशल मीडियावर त्याला व्होट करा, असं नम्र आव्हानही केलं होतं. मात्र शिव ठाकरे याचं बिग बॉस होण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं.
“जे व्हायचं होतं ते झालं. माझ्या मंडळीतील एमसी स्टॅन हा ट्रॉफी घेवून गेला. मी त्यामुळे प्रचंड आनंदी आहे. मी शेवटच्या दिवसापर्यंत विजयी होण्यासाठी प्रयत्न केले. मी जी गोष्ट मनापासून केली, ती मला मिळाली आहे. अनेकांनी माझं कौतुक केलं, मला पाठिंबा दिला. मी लोकांचं प्रेम घेवून बाहेर निघालो आहे”, अशी प्रतिक्रिया शिव याने दिली.
सलमान खान याने एमसी स्टॅन याला बिग बॉसची ट्रॉफी दिली. हिरे आणि सोन्यापासून ही ट्रॉफी बनवण्यात आली. या ट्रॉफीची किंमत 9 लाख 34 हजार आहे.या ट्रॉफीवर हिऱ्यांचे सुंदर काम करण्यात आले आहे. ही अत्यंत खास ट्रॉफी आहे.
दरम्यान हा ग्रँड फिनाले तब्बल पाच तास चालला. या दरम्यान अनेक धमाकेदार डान् पाहायला मिळाले. त्यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन झालं. एमसी स्टॅन, शिव ठाकरे, प्रियंका चौधरी, शालिन भनोट आणि अर्चना गौतम या 5 जणांमधून बिग बॉस विनर म्हणून एमसी स्टॅन याची निवड करण्यात आली.
बिग बॉस 16 ची 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरूवात झाली होती. यादरम्यान घरातील स्पर्धेकांनी जबरदस्त मनोरंजन केले आहे. विशेष म्हणजे बिग बॉस 16 सिजन टीआरपीमध्येही टॉपला राहिला.