मुंबई | 29 जानेवारी 2024 : बिग बॉसच्या 17 व्या सिझनचा ग्रँड फिनाले काल पार पडला. स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारूकी बिग बॉसच्या 17 व्या सिझनचा विजेता ठरला. मुनव्वर फारूकीला बिग बॉस 17 च्या ट्रॉफीसोबतच 50 लाख रुपये आणि ह्युंडाई क्रेटा ही कार मिळाली आहे. पण मुनव्वरचा आजपर्यंतचा प्रवास प्रचंड खडतर राहिला. मुंबईतील डोंगरी भागात राहणाऱ्या या कॉमेडियनने अनेक धक्के पचवले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शोमध्ये तो सहभागी झाला. शिवाय त्याने आपल्या खास अंदाजाने लोकांची मनं जिंकली. अन् ‘लॉक अप’ हा शो देखील…
मुनव्वरचं बालपण गुजरातच्या जुनागढमध्ये गेलं. 2002 ला उसळलेल्या दंगलीत मुनव्वरचं घर उद्धवस्त झालं. वयाच्या अवघ्या 16 वर्षी मुनव्वरच्या डोक्यावरून आईचं छत्र हरपलं. पुढे मुनव्वर आणि त्याच्या तीन बहिणींना घेऊन त्याचे वडील मुंबईतील डोंगरी भागात राहायला आले. पण इथे आल्यावरही संघर्षाने त्याची पाठ सोडली नाही. वडिलांच्या आजारपणामुळे त्याला घराची जबाबदारी उचलावी लागली.
घरातील खर्च भागवण्यासाठी त्याने एका भांड्याच्या दुकानात काम केलं. ग्राफिक्स डिझायनिंग तो करू लागला. यातूनच त्याला त्याच्यातील कलाकार सापजडला. कारण पोस्टरवर एका ओळीची पंचलाईन असते. त्या ओळी लिहिताना मुनव्वरला जाणवलं की, आपण छान लिहू शकतो.
पुढे त्याची पावलं स्टँडअप कॉमेडीकडे वळाली. त्याच्या शोला लोक गर्दी करू लागले. त्याच्या पंचला लोक रिस्पॉन्स देई लागले. यूट्यूबवर त्याच्या शोला पसंती मिळू लागली. पुढे कंगना रनौतचा ‘लॉक अप’ हा रिअॅलिटी शो आला. त्याला तिथे बोलावलं गेलं. तो सहभागी झाला अन् जिंकला सुद्धा… अन् आता बिग बॉसच्या 17 व्या सिझनमध्ये तो पोहोचला. तेव्हापासूनच लोकांचं प्रेम त्याला मिळालं अन् तो या शोचा विजेता ठरला. बिग बॉस 17 च्या विजेतेपदाचा किताब मुनव्वरच्या नावावर आहे. बिग बॉसच्या घरातील एक- एक टप्पा पार करत मुनव्वरने जेतेपदाची ट्रॉफी जिंकली.