‘मूर्ती लहान, कीर्ती महान’ असणारा छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडे ‘बिग बॉस मराठी’च्या घरामधून बाहेर पडला आहे. आपल्या बोलण्याच्या शैलीमुळे प्रसिद्ध झालेल्या घन:श्यामने ‘बिग बॉस मराठी’च्या घरातही चांगलाच धमाका केला. संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये राज्य करण्याचा प्रयत्न घन:श्यामने केला. गर्दी जमवणारा, सभा गाजवणारा, व्यासपीठावरुन भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या छोट्या पुढारीची बिग बॉस मराठीच्या घरातही चांगलीच हवा होती. त्याचे अनेक व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.
आपली मतं रोखठोक मांडणारा, मोठमोठ्या नेत्यांना चॅलेंज देणारा छोटा पुढारी ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेताना छोटा भावूक झाला. टास्क आहे… खेळ हा खेळ असतो. मी टास्कमध्ये, खेळामध्ये हरलो असलो तरी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एक माणूस म्हणून चांगलं जगण्याचा मी प्रयत्न केला आहे. चांगला माणूस कसा असावा हे बिग बॉस मराठीच्या घरामधून दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. मी 100% टक्के बिग बॉस मराठीचा गेम परिपूर्ण खेळलो आहे, असं घन:श्याम दरवडे याने म्हटलं आहे.
‘बिग बॉस मराठी’ च्या घरात घन:श्यामने एक चमक, धमक घेऊन प्रवेश केला होता. पण मध्ये अचानक तो शांत झाला आणि बाजी पलटली. ‘बिग बॉस मराठी’चं घर आणि या खेळाबद्दलही छोटा पुढारी बोलता झाला. इथे डोक्याने गेम चालतो आणि मी माझ्या मनाने गेम खेळलो आहे. माणसं जोडली, माणसांना मी माणसांप्रमाणे वागवत होतो पण लोकांनी डोक्यात ठेऊन गेम केला. माझा गेम कुठे चुकला, कुठे पलटला असं मला वाटत नाही. पण बिग बॉसच्या घरात दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं एवढं मात्र मला कळलं, असं घन:श्यामने म्हटलं आहे.
घन:श्याम बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. त्यावर त्याच्या चाहत्यांनी कमेंट करत त्याला सदिच्छा दिल्यात. मान्य आहे तू चुकला…पण तितक्याच ताकतीने लढला सुध्दा…एक भाऊ म्हणून तू घराबाहेर येताना खूप रडू आलं…तू बिग बॉसमध्ये गेला. हेच खूप आहे आमच्यासाठी… कायम तुझ्यासोबत आहे, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.
कसे आहात कसे इंटरटेन्मेंट करता किती स्ट्रगल करता यापेक्षा प्रेक्षक तुम्हाला कसे पाहता, याच महत्त्व तर नेहमीच असेल. श्यामराजे महाराष्ट्रच्या जनतेवर जिवापाड प्रेम केलं. करत आहेत, कराल, यात शंका नाही. पण प्रेक्षकांच मन कोणीतरी तिसरा घटक चालवत असेल तर सन्मानपूर्वक बाहेर पडा. घेउन परत एकदा महाराष्ट्राच्या जनतेचं मन जिंकण्यासाठी तुम्हाला भावी वाटचालीस शुभेछा!, असंही त्याच्या चाहत्याने म्हटलं आहे.