कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अंतरपाट’ या मालिकेत लग्नाचा ट्रॅक सुरु आहे. गौतमी आणि क्षितिज यांच्या लग्नसोहळ्याचा महासप्ताह या मालिकेत दाखवण्यात येत आहे. ‘अंतरपाट’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. या मालिकेत सध्या गौतमी आणि क्षितिजचा पारंपरिक लग्नसोहळा पार पडतो आहे. या लग्नसोहळ्याचं विशेष आकर्षण ठरतंय, ते म्हणजे महाराष्ट्राचं परंपरागत लोकसंगीत. मराठी टेलिव्हिजन विश्वात पहिल्यांदाच ‘अंतरपाट’ मालिकेत पारंपरिक लग्नसोहळ्यादरम्यान महाराष्ट्राच्या लोकसंगीताचं अनोखं दर्शन घडवण्यात आलं आहे. गौतमी आणि क्षितिज यांचा महाराष्ट्राच्या लोकसंगीताचा सुगंध घेऊन आलेला हा लग्नसोहळा ‘अंतरपाट’ मालिकेत पाहता येत आहे.
गौतमी-क्षितिजचा लग्नसोहळा हा वैविध्यपूर्ण गोष्टींनी सजला आहे. बेगडी दिखाव्याच्या काळात आपला लग्नसोहळा अत्यंत परंपरापूर्ण व्हावा ही गौतमीची इच्छा होती. आपल्या आयुष्यातला हा सगळ्यात महत्त्वपूर्ण दिवस अनोख्या पद्धतीने सजवण्यासाठी गौतमी आग्रही होती आणि तिच्या इच्छेनुसार अत्यंत मऱ्हाठमोळ्या पद्धतीने गौतमी- क्षितिजचा हा विवाहसोहळा पार पडतोय. मराठी मातीतलं संगीत आणि लोकपरंपरेच्या साथीनं हा लग्नसोहळा सजला आहे.
आजकाल लग्नसोहळ्यात चकचकीत रोषणाईने सजवलेले हॉल, ट्रेंडिंगच्या नावाखाली केले जाणारे विविध प्रकार पाहायला मिळतात. पण या सगळ्या झगमगाटात महाराष्ट्राची परंपरा आणि सांस्कृतिक वैभव बाजूलाच पडतेय. पण महाराष्ट्राच्या या गतवैभवाला ‘अंतरपाट’ मालिका या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने उजाळा देत आहे.
क्षितिज आणि गौतमीच्या लग्नात कोणताही दिखावा न करता लोककलेच्या माध्यमातून आलेल्या पाहुण्याचं मनोरंजन करण्यात आलं आहे. ‘दादला नको गं बाई’ हे भारूड, ‘धरिला पंढरीचा चोर’सारख्या गीतांचा समावेश आहे. शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीतांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. लग्नसोहळ्यात मराठमोळ्या परंपरेचा आणि लोककलेचा समन्वय दिसत असे.. पण आज मात्र हे हरवत चाललं आहे.
लोककलेच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचा हा समृद्ध वारसा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या मालिकेत प्रयत्न करण्यात आला आहे. ‘अंतरपाट’ मालिकेतील रश्मी अनपट आणि अक्षय ढगे हे कलाकार आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडत आहेत. त्यांच्या भूमिकांसह पारंपरिक वेशभूषेमुळे लग्नसोहळा अधिकच उठून दिसतो आहे.