जाकिर खान… सामान्य घरातील मुलगा ते प्रसिद्ध कॉमेडियन असा त्याचा प्रवास आहे. भारतातील प्रसिद्ध कॉमेडियनच्या यादीत जाकिरचा नंबर वरचा लागतो. ‘आपका अपना जाकिर’ नावाचा त्याचा कॉमेडी शो सोनी मराठीवर येत आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या कार्यक्रमातील त्याचं सूत्रसंचालन देखील प्रेक्षकांना आवडतं आहे. हा कार्यक्रम सुरु झाल्यानंतर जाकिर खानने मनातील खंत त्याने बोलून दाखवली आहे. आधी चिडवणारे नातेवाईक- मित्र आता फोन करतात…, असं म्हणत जाकिरने त्याच्या मनातील शल्य बोलून दाखवलं आहे.
जाकिरने एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केलीय. यात त्याने लहानपणी त्याच्या रंगावरून हसणाऱ्या लोकांबद्दलची त्याची तेव्हाची आणि आताची भावना शेअर केली आहे. लोक मला विचारतात की तू खूप विनोदी आहेस, तू लहानपणापासूनच असा आहेस का? त्यांना मी सांगतो की नाही… लहानपणी मी खूप वेगळा माणूस होतो. तेव्हा लोक माझ्यावर हसायचे पण मी मात्र खजिल होत होतो. अंधारात दिसत नाहीस… तू सावळा आहेस… तुला लग्नासाठी हो बोलले तर मुलं काळीच होतील, असं लोक मला म्हणायचे. हे असे जोक आहेत, जे ते लोकही हसून बोलायचे. आजूबाजूचे लोकही त्यावर खळखळून हसायचे. ते असं हास्य होतं, ज्याने बोललेले शब्द आणखी बोचायचे, असं जाकिर खान म्हणाला आहे.
सगळे हसले… सगळ्यांना त्यावेळी मजा वाटली. पण तेव्हा मी एकटाच होतो जो या जोक्सवर हसायचो नाही. या गोष्टींचं तेव्हा माझ्याकडे उत्तर नव्हतं. आजही नाहीये… पण याच टोमण्यांनी मला वेगळं काहीतरी करण्यासाठी कायम प्रोत्साहित केलं. नव्या पद्धतीने मेहनत करण्याची मजबुरी निर्माण केली. या लोकांना उत्तर देण्यासाठी रात्रभर जागलो. त्याने मी बोलणाऱ्या लोकांना उत्तर नाही देऊ शकलो. पण जगाच्या मोठ्या लढाईसाठी मी तयार झालो. त्याच्यातून जे साध्य झालं तो माझा वर्तमान आहे, असं जाकिरने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आता जेव्हा त्या चिडवणाऱ्या लोकांचा मला फोन येतो, तेव्हा मी केवळ स्माईल करतो. कारण जेव्हा त्यांना उत्तर द्यायचं होतं. तेव्हा माझ्याकडे उत्तर नव्हतं आणि आता त्यांना उत्तर देणं माझ्या तत्वात बसत नाही. याचमुळे केवळ हसणं योग्य वाटतं. पण माझ्या लक्षात सगळे टोमणे आहेत आणि पुढेही राहतील, असं जाकिरने म्हटलं आहे.