मुंबई : टीव्हीवर भगवान शिवाचे पात्र साकारणाऱ्या मोहित रैना (Mohit Raina) याला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. मोहितने ‘देवों के देव- महादेव’मध्ये भगवान शिवाची भूमिका इतक्या चांगल्या प्रकारे साकारली आहे की, आता महादेव-भगवान शंकर म्हणताच लोकांच्या डोळ्यापुढे त्याचा चेहरा येतो. मोहित टीव्ही जगताचा एक प्रसिद्ध अभिनेता बनला आहे.
आज (14 ऑगस्ट) अभिनेता मोहित रैना आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 14 ऑगस्ट 1982 रोजी जम्मूमध्ये झाला. मोहित रैना वडिलांचे नाव पी. एल. रैना आहे, तर त्याच्या आईचे नाव सुषमा कुमारी आहे. जम्मूच्या केंद्रीय विद्यालयात त्याने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. अभिनेत्याने जम्मू विद्यापीठातून पदवीचे शिक्षण देखील पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर, मोहित करिअर करण्यासाठी मुंबईला आला.
मोहित रैनाला सुरुवातीपासूनच मॉडेलिंग करायचे होते आणि म्हणूनच त्याने मुंबईत आल्यानंतर मॉडेल होण्याचा निर्णय पक्का केला होता. पण त्याआधी मोहितला स्वतःवर खूप काम करायचे होते. कारण या काळात अभिनेत्याचे वजन सुमारे 107 किलो होते. यासाठी मोहितने सर्वात आधी आपले वजन 29 किलोंनी कमी केले.
वजन कमी करण्याबरोबरच मोहितने 2005च्या दरम्यान ‘ग्रासिम मिस्टर इंडिया’ च्या मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला. यामध्ये मोहितला 5वा क्रमांक मिळाला होता. त्याची अभिनय कारकीर्दही याच वर्षी सुरू झाली. मोहित रैनाने 2005मध्ये ‘अंतरिक्ष’ या विज्ञानकथेवर आधारित मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले .
मोहिटची पहिली टीव्ही मालिका स्टार प्लसवर दाखवली गेली. या मालिकेत या त्याने ‘विक्रांत’ नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. यासह, 2005 मध्येच, अभिनेत्याने ‘भाभी’ या मालिकेतही काम केले. मात्र, तो खूप कमी काळासाठी या शोमध्ये दिसला. त्यानंतर मोहित रैनाने ‘चेहरा’ या मालिकेमध्येही काही काळ काम केले.
2010 च्या दरम्यान, मोहित टीव्ही शो ‘बंदिनी’ मध्ये दिसला होता. यामध्ये यामध्ये त्याने रिषभ हितेनचे पात्र साकारले होते. या शोमध्ये त्याच्यासोबत रोनित रॉय आणि असिया काझीही झळकले. या शोचे 520 भाग प्रदर्शित झाले होते. पण, या शोमध्येही मोहितचे पात्र फार काळ टिकले नाही. 2011 मध्ये, अभिनेत्याने ‘गंगा की धीज’ मध्ये काम केले. या शोमध्ये त्याच्यासोबत कबीर बेदी, अश्वनी काळसेकर, लीना जुमानी आणि सौरभ जुबे यांच्या देखील मुख्य भूमिका होत्या.
2011 या वर्षातच मोहितचे भाग्यही बदलले. याचवर्षी त्याला असे एक पात्र मिळाले, ज्याने त्याला सर्वात जास्त लोकप्रियता मिळवून दिली. मोहितने ‘लाईफ ओके’च्या ‘देवों के देव… महादेव’ या मालिकेत काम केले. या शोमध्ये मोहित रैना भगवान शिवाच्या भूमिकेत दिसला होता. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या शोमुळे आजही लोकांना मोहितची आठवण ‘महदेव’ म्हणूनच येते.
या शोला प्रेक्षकांकडून जास्त प्रेम मिळण्यामागील आणखी एक कारण म्हणजे या शोमध्ये भगवान शिव यांच्या जीवनातील प्रत्येक पैलू अर्थात सुरुवातीपासून शेवटपर्यंत खूप चांगले कथानक दाखवले गेले. मोहितने साकारलेले भगवान शिवाचे पात्र लोकांच्या हृदयात घर करून गेले. मौनी रॉय आणि सोनारिका भदोरिया या शोमध्ये त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. या टीव्ही शो दरम्यान, मोहितने स्टार प्लसच्या टीव्ही शो ‘महाभारत’ मध्ये भगवान शिवाची भूमिकाही केली होती. यानंतर अभिनेत्याने ‘चक्रवर्तीन अशोक सम्राट’ मध्ये ‘सम्राट अशोका’ची भूमिका साकारली.
मोहित रैनाच्या अभिनय कारकिर्दीत, 2018ची टीव्ही मालिका ’21 सरफरोश-सारागढी 1897 ‘ हे आणखी एक नाव जोडले गेले. या शोमध्ये मोहितने ‘हवालदार इशर सिंह’ची भूमिका साकारली होती. या मालिकेसाठी अभिनेत्याला अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात आले.
मोहित रैनाने अनेक चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य देखील दाखवले आहे. तो 2008 ‘डॉन मुथू स्वामी’ या चित्रपटात ‘जयकिशन’ या भूमिकेत दिसला होता. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उरी – द सर्जिकल स्ट्राइक’ या मोठ्या बॉलिवूड चित्रपटात मोहित रैना एक सैनिक म्हणून झळकला होता. यानंतर, 2019 मध्येच, तो ‘काफिर’ मध्ये देखील दिसला. अभिनेता मोहित रैना वेब सीरीजमध्येही सक्रिय आहे, तो नुकताच ‘भौकाल’ या सीरीजमध्ये दिसला होता.