अत्यंत साधी राहणी पण सुपरहिट डायलॉगमुळे महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मोबाईलसह मनामध्ये स्थान मिळवलेला हा तरूण… हा दुसरा तिसरा कुणी नसून हा आहे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सूरज चव्हाण… सूरज चव्हाणचा व्हीडिओ पाहिला नाही, असा क्वचितच कुणी… जरी तुम्ही सूरजला सोशल मीडियावर फॉलो करत नसाल तरी रील्स स्क्रोल करताना त्याचा व्हीडिओ तुमच्या समोर आला असेल अन् तुम्ही तो पाहिला देखील असेल. पण सामान्य घरातील सूरज चव्हाण रीलस्टार कसा झाला? सूरजने रील्स बनवण्याचा निर्णय कसा घेतला? व्हीडिओ बनव म्हणून त्याला कुणी सांगितलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या बातमीच वाचायला मिळणार आहेत.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सूरज चव्हाण हा सध्या बिग बॉस मराठीच्या घरात आहे. बिग बॉसच्या घरात इतर स्पर्धकांसोबत गप्पा मारताना सूरजने त्याच्या रीलस्टार होण्याची गोष्ट सांगितली. माझ्या मोठ्या बहिणीची मुलगा म्हणजे माझ्या भाच्याने मला सांगितलं की मामा तू रील बनव… खूपजण असे व्हीडिओ बनवायचे मलाही वाटलं आपणही व्हीडिओ बनवावेत. आपल्या भावना कुठेतरी मांडाव्यात. मग व्हीडिओ बनवायला सुरुवात केली. लोक आपले व्हीडिओ बघतात हे पाहून सुरुवातीला खूप आनंद व्हायचा, असं सूरज म्हणाला.
व्हीडिओ करायला लागलो आणि ते व्हीडिओ व्हायरल व्हायला लागले. खूप लोक लाईक करू लागले. फॉलो करू लागले. ते बघून खूप आनंद व्हायचा. लाईक केलं की बदाम येतं ना… ते बदाम बघून लय आनंद व्हायचा. कितीही स्क्रोल केलं तरी ते लाईक्स संपायचेच नाहीत, असं म्हणत सूरजने आपल्या भावना व्यक्त केल्या.
मी खोटं बोलत नाही पण सहा हजारच्या पेक्षा जास्त फोन मला त्या काळात यायचे. सारखे फोन वेटिंगवर असायचे. कितीतरी लोक फोन करायचे. व्हीडिओ आवडल्याचं सांगायचे. भेटायला लोक यायचे. कितीही स्क्रोल केलं तरी कॉलिंग लिस्ट संपायची नाही, असं सूरजने सांगितलं. यावेळी बिग बॉसमधील इतर स्पर्धकही त्याच्यासोबत होते. तर अंकिता वालावलकरनेही तिला सूरजचे व्हीडीओ आवडत असल्याचं म्हटलं. सूरजचे व्हीडिओ हे माझा दिवसभराचा स्टेस घालवण्याचं औषध आहे, असं अंकिता म्हणाली.