‘बिग बॉस मराठी’चा यंदाचा सिझन खूप गाजतोय. यात काही स्पर्धक प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. ‘कोकण हार्टेड गर्ल’ अर्थात अंकिता प्रभू वालावलकरचा गेम देखील प्रेक्षकांना आवडतो आहे. मात्र काल पार पडलेल्या ‘भाऊचा धक्का’मध्ये अंकिताच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. ‘बिग बॉस मराठी’चा एक प्रोमो काल समोर आला होता. यात अंकिता ही बिग बॉसच्या घरातून बाहेर जाणार असल्याचं दाखवण्यात आलं होतं. अंकिताला अचानक घराबाहेर जावं लागणार असल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अंकिताच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर सताप व्यक्त केला आहे.
अंकिता वालावलकर हिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. ती घराबाहेर पडणार असल्याचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर होताच नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडलाय. अंकिता वालावलकर घराबाहेर पडणार असेल तर आम्ही आजपासून बिग बॉस बघणार नाही, अशी कमेंट तिच्या चाहत्याने केलीय. असं होणार असेल तर बिग बॉस बघायची इच्छा होणारच नाही.. कारण अंकिता बेस्ट आहे, अशीही कमेंट या प्रोमोवर पाहायला मिळत आहे. काहीही हा… या आठवड्यात वोटिंग लाईन्स बंद होत्या. तरी जर हे असं झालं ना, बिग बॉस बघन बंद करेन. म्हणजे बिग बॉसच्या मते प्रेक्षकांना काही किंमतच नाहीये, अशीही कमेंट नेटकऱ्याने केलीय.
‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो सर्वांना थक्क करणारा आहे. प्रोमोमध्ये रितेश भाऊ म्हणत आहे की या घरातून बाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव आहे अंकिता… त्यानंतर अंकिता तिच्या नावाची पाटी घेऊन सर्व सदस्यांची भेट घेऊन घराबाहेर पडताना दिसत आहे. अंकिताचा प्रवास संपल्याने डीपी दादा आणि सूरजला अश्रू अनावर झाल्याचं दिसतंय. पण हा प्रॅन्क असल्याचं आता समोर आलंय. अंकिता जेव्हा घराबाहेर पडायला लागते. तेव्हा समोर एक पाटी दिसते. त्यावर तू घरातून बाहेर जात नाहीयेत, असं लिहिलेलं असतं. इथून पुढे चांगलं खेळ, असं या पाटीवर लिहिलेलं आहे.
आजचा भाग खूपच रंगतदार असणार आहे. एकीकडे घरात आज कठीण टास्क पार पडणार आहे. निक्की अंकिताला अभिजीतबद्दल सांगताना दिसणार आहे. माझ्यापेक्षा जास्त विश्वास अभिजीतचा तुझ्यावर आहे. कारण पहिल्या दिवसापासून तुम्ही दोघं सोबत आहात. आमची फ्रेडशिप असली तरी त्याचं तुझ्यासोबत एक वेगळं कनेक्शन आहे. काल तू घराबाहेर जाणार असल्याची घोषणा केली तेव्हा अभिजीत म्हणाला होता की, मी संपलो आणि त्याच्या डोळ्यात अश्रू होते. माझ्यावरुन वरचा दर्जा तो तुला देतो. त्याला तुझी गरज आहे, असं निक्की अंकिताला सांगताना आजच्या भागात दिसेल.