आज सर्वत्र मातृदिन साजरा केला जात आहे. कलाकारही हा दिवस साजरा करत आहेत. आई आणि मुलाचं नातं शब्दात व्यक्त करता येत नाही. पडद्यावर आईची भूमिका साकारतानादेखील याचा अनुभव येतो.’शिवा’ मालिकेतल्या सीताई ही भूमिका अभिनेत्री मीरा वेलणकर हिने साकारली आहे. मीरा वेलणकरने आपल्या आईपणाचे आणि सेट वर आशुच्या आईची भूमिका निभावताना असं काय झालं की तिला रडू आलं? याचा किस्से तिने सांगितला. पडद्यावर आईची भूमिका साकारताना तिच्या भावनांची झालेली घालमेल तिने सांगितली. सिताईची भूमिका करताना विसरूनच गेले की हा मालिकेतील सीन आहे, असं मीरा वेलणकर म्हणाली.
‘शिवा’ मालिकेच्या निमित्ताने मला कळेल की मला पुढे जाऊन कसं वागायला हवे आणि कसं नाही. एकदा तुम्ही आई झालात की तुमच्यात एक प्रेमभावना असते. मग ते ऑनस्क्रीन मुलगा असो किंवा खरा मुलगा… त्यादिवशी आम्ही एक सीन करत होतो जिथे आशु रात्रभर घरी आलेला नसतो आणि आई म्हणून मी अत्यंत काळजीत असते. मग अचानक तो घरी येतो मी त्याला पाहते आणि रडायलाच लागते. तेव्हा माझ्या मनात हे चालू होतं की खऱ्या आयुष्यात जर माझा मुलगा घरी आला नाही. तर मी काय करेन त्या विचाराने शॉट देता देता माझं डोळे पाणावले. तो सीन करताना माझ्या मनाची खूप चलबिचल झाली, असं म्हणत मीरा वेलणकरने शिवा मालिकेच्या शुटिंग दरम्यानचा किस्सा सांगितला.
जोपर्यंत मी आई झाले नव्हते. तोपर्यंत माझं पूर्ण लक्ष माझ्या करिअरवर होतं. मी अॅडव्हर्टाईजिंग क्षेत्रात काम करत होते. म्हणतात ना आई झाल्यावर आयुष्य बदलून जातं तर त्या वाक्याचा अर्थ कळायचा नाही. असा वाटायचं की बाळ झाल्यावर काही महिन्यांसाठी वेळ आणि लक्ष बाळावर राहील. मग काही महिन्यातनंतर सर्व पाहिल्यासारखं होईल. पण आई झाल्यावर लक्षात आलं की माझ्यामध्ये आपणहून बदल होत आहेत, ते लहानबाळ तुमचं सर्व लक्ष आपल्याकडे केंद्रित करून घेतं, असं मीरा म्हणाली.
आईपण शिकावं नाही लागतं ते तुमच्यामध्ये आपसूक येतं. माझा मुलगा जन्माला आला तेव्हा सुरवातीचे काही दिवस माझ्या डोक्यात हाच विचार चालू असायचा की त्यांनी खाल्लं का, त्याची अंघोळ झाली का, त्याला आता भूक लागली असेल का? ह्या सर्वामध्ये मी हे विसरून जायचे की माझी विश्रांती झाली आहे की नाही आणि हे सगळं फक्त आईपण अनुभवल्यावरच होऊ शकत. कुठली ही गोष्ट असो ती अभ्यासपूर्व करायची अशी माझी पद्धत आहे. म्हणून मी गरोदर असताना प्रेग्नन्सी, पोस्ट-प्रेग्नन्सी, मुलाचं संगोपन, मुलाचा विकास ह्या सगळ्याची खूप पुस्तक वाचली होती खूप माहिती होती पण जेव्हा मी खऱ्या अर्थाने आई झाले. तेव्हा कळले की ती माहिती आहे अनुभव नाही, असं म्हणत मीरा वेलणकरने तिच्या भावना व्यक्त केल्या.