‘ती’ गोष्ट लहानपणापासून मनावर कोरून ठेवलीय; मतदानानंतर मिलिंद गवळी यांनी शेअर केली पोस्ट

| Updated on: May 20, 2024 | 5:55 PM

Actor Milind Gawali Post About Voting Loksabha Election 2024 : अभिनेते मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केलं आहे. त्यांनी मतदान केल्यानंतरचा एक व्हीडिओदेखील शेअर केलाय. वाचा सविस्तर...

ती गोष्ट लहानपणापासून मनावर कोरून ठेवलीय; मतदानानंतर मिलिंद गवळी यांनी शेअर केली पोस्ट
Follow us on

आज मुंबईसह अन्य ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली. अनेक कलाकारांनीही आपलं मत दिलं. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरुद्ध अर्थात अभिनेते मिलिंद गवळी यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. वडिलांसोबत जात त्यांनी मतदान केलं. मतदान केल्यानंतर मिलिंद गवळी यांनी वडिलांसोबतचा व्हीडिओ शेअर केलाय. यावेळी त्यांनी आठवणी सांगितल्यात. माझ्या बाबांनी मतदानाचं महत्त्व अगदी माझ्या लहानपणापासून माझ्या मनामध्ये कोरून ठेवलं आहे, असं मिलिंद गवळी यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

मिलिंद गवळी यांची पोस्ट जशीच्या तशी

“मतदान”
पाच वर्षानंतर परत आपलं मत देण्याचा योग आला,
ज्या वेळेला मत देण्याचा अधिकार मला मिळाला त्या दिवसापासून आजपर्यंत कधीही मतदान करायचं किंवा मत देण्याचं चुकलं नाही, त्याचं कारण म्हणजे माझे वडील निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री श्रीराम गवळी. मतदानाचे महत्त्व त्यांनी अगदी माझ्या लहानपणापासून माझ्या मनामध्ये कोरून ठेवलं आहे, constitution ने , घटनेने आपल्या दिलेला हा खूप महत्त्वाचा अधिकार आहे ,असं मला लहानपणापासूनच कळलं होतं. त्यामुळे इतकी वर्ष मी मतदानाच्या दिवशी बिझी जरी असलो तरी सुद्धा मत द्यायला मात्र कधीही चुकलेलो नाही.

माझी आई असताना मतदानाच्या दिवशी खूप धमाल असायची, वडीलांनी अमुक एका व्यक्तीला मत दे असं सुचवल्यावर, आई अगदी त्याच्या विरोधी उमेदवाराला मत देणार असं म्हणायची, आणि वडील तिची आठवडाभर विणवणी करायचे, म्हणायचे “एक मत फुकट जाईल तुझं” “मी सांगतो त्या उमेदवारालाच मत दे”, त्याच पक्षालाच मत दे .

मतदान करेपर्यंत ती त्यांना चिडवायची, पण नंतर मतदान करून आल्यानंतर मला हळू सांगायची की “त्यांनी ज्या उमेदवाराला मत द्यायला सांगितलं होतं त्या उमेदवारालाच मी दिले आहे”, फक्त यांची गंमत करते आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टीवर किंवा पिकनिकला जाणारे किंवा घरी आळशीपणा करणाऱ्या वर वडील खूप वैतागायचे , अजूनही फोन करून सगळ्यांना आठवण करून देतात, पण आई गेल्यापासून ते आमच्यावर त्यांना योग्य वाटणारा उमेदवार लादत नाहीत, “तुम्हाला जो व्यक्ती योग्य वाटतो त्याला तुम्ही मत द्या, पण मतदान करायचं टाळू नका”पुन्हा आज पण दरवेळेस सारखं मतदान केल्याबद्दल त्यांनी मला हजार रुपये बक्षीस दिलं .

वयाच्या 85 व्या वर्षी सुद्धा इतक्या उत्साहात सकाळी सात वाजता मतदान केंद्रावर त्यांचं मत देण्यासाठी हजर होते. 55 ते 60 टक्के जे मतदान होतं त्यात माझ्या वडिलांसारख्या लोकांमुळे आपला देश योग्य नेत्यांच्या हातात जातो, चाळीस पंचेचाळीस टक्के जे लोक मतदान करत नाहीत ते आपल्या देशाचं दुर्दैव आहे, त्यातले खूप कमी लोकं genuine कारणामुळे मतदान करत नाहीत, पण त्यातले बरेचसे लोक वीकेंड बघून picnic ला निघून गेलेले असतात. मी माझ्या वडिलांच्या वतीने तुम्हा सगळ्यांना मतदान करण्याचा आग्रह करतो, संध्याकाळी पाच वाजेच्या आत जाऊन मतदान करा.