‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. आधी मुलाचा जन्म त्याची अदलाबदल या सगळ्यातून अप्पी आणि अर्जुन जात होते. आता त्यांचा लहान मुलगा सापडला आहे. अशातच आता पुन्हा एकदा अप्पी आणि अर्जुनच्या जीवनात नवं संकट आलं आहे. या दोघांनीही आपल्या जीवनात वेगवेगळ्या वाटेवर निघायच्या तयारी केली आहे. अप्पीची बदली उत्तराखंडला झाल्याचं मालिकेत दाखवण्यात आलं आहे. याचा प्रोमो समोर आला आहे. त्यामुळे आता अप्पी उत्तराखंडला जाणार की काही वेगळा निर्णय घेणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
अप्पी अर्जुनला तिची बदली उत्तराखंडला झाली असल्याचे सांगते. तेव्हा अर्जुन अप्पीसोबत जाणार का? असा प्रश्न निर्माण झालाय. अर्जुनसमोर त्याचे काम सोडून, इथलं सगळं सोडून अप्पीसोबत उत्तराखंडला जाणं किंवा इकडंच राहणं असे दोन पर्याय आहेत. पण अर्जुन मात्र इथंच राहण्याचा निर्णय घेतो. अप्पीने आईबद्दल गोष्टी लपवल्यामुळे अर्जुन इकडेच राहायचा निर्णय घेतो.
अर्जुन अप्पीला अमोलला त्याचा बाबा हरवला असल्याचं सांगायला सांगतो. जेणेकरून तो अप्पीलाच आई आणि बाबा मानून जगायला शिकेल. जसा अर्जुन स्वतः त्याची आई गेल्यावर विनायकलाच आई-बाबा समजून जगत होता. अशातच अप्पीपुढेही काही पर्याय नसल्याने अप्पी अमोलला घेऊन उत्तराखंडला निघून जाते. अप्पी आणि अर्जुनच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलंय ? ते दोघे पुन्हा एकमेकांजवळ शकतील? त्यासाठी तुम्हाला’अप्पी आमची कलेक्टर’ मालिका पाहावी लागणार आहे.
सुजय आणि पियुमुळे सरकारांचं सत्य समोर येतं. सरकारांनी पैश्यांच्या लोभासाठी अर्जुनच्या आईची ट्रीटमेंट होऊ दिली नाही. हे ऐकून अर्जुन आणि विनायकला धक्का बसतो. सरकार त्यांची चुक मान्य करतात. चिडलेला अर्जुन विनायक, अप्पीसोबत आणि अमोलसोबत घरातून बाहेर जायचा निर्णय घेतो. तेव्हा सुजय अप्पीला हे सत्य माहित असल्याचे सांगतो. हे ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसतो.
अप्पीही तिला सत्य माहिती असल्याचे मान्य करते. पण अमोलचा जन्म, त्याची अदलाबदल आणि त्यात अर्जुनला हे सत्य सांगून अजून त्रास द्यायचा नव्हता. म्हणून हे सत्य ती त्याच्या पासून लपवते. अर्जुन ते ऐकून अप्पीवर चिडतो. अर्जुनने भ्रष्टाचार केलेला तेव्हा त्याने स्वतःचा गुन्हा अप्पीसाठी आणि तिच्या तत्वासाठी मान्य केल्याचे आठवण करून देतो. पण आता अप्पी स्वतः तिच्या तत्वांना बगल देऊन एवढी मोठी गोष्ट लपवली असल्याने अर्जुन तिला सोडून विनायकसोबत घरातून निघतो.