‘चला हवा येऊ द्या’ घेणार प्रेक्षकांचा निरोप; विनोदी कार्यक्रमाच्या वेळेवर येणार दोन नव्या मालिका

| Updated on: Mar 17, 2024 | 1:40 PM

Chala Hawa Yeu Dya will close Form Today New Serial on that time : 'चला हवा येऊ द्या' च्या वेळेत झी मराठीवर पाहायला मिळणार दोन नव्या मालिका; 'चला हवा येऊ द्या'च्या वेळेवर येणाऱ्या दोन नव्या माविका कोणत्या? कधीपासून सुरु होणार प्रसारण? वाचा सविस्तर...

चला हवा येऊ द्या घेणार प्रेक्षकांचा निरोप; विनोदी कार्यक्रमाच्या वेळेवर येणार दोन नव्या मालिका
Follow us on

मुंबई | 17 मार्च 2024 : चला हवा येऊ द्या… या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाने महाराष्ट्राचं निखळ मनोरंजन केलं. गेली दहा वर्षे या रिॲलिटी शोने महाराष्ट्राला खळखळून हसवलं. हसताय ना मंडळी हसायलाच पाहिजे, म्हणत या कार्यक्रमातील कलाकारांनी महाराष्ट्राच्या घराघरात आपलं स्थान निर्माण केलं. प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आज या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. या विनोदी कार्यक्रमाच्या जागी आता दोन नव्या मालिका झी मराठीवर प्रसारित होणार आहेत.

नव्या मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज

चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम बंद होत असल्याने या जागेवर आता कोणता नवा कार्यक्रम प्रसारित होणार आहे, याची चर्चा होत आहे. तर झी मराठी वाहिनीकडून या बाबतची माहिती देण्यात आली आहे. रात्री साडे नऊ वाजता चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम प्रसारित व्हायचा या वेळेवर आता नवे कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘नवरी मिळे हिटलरला’ आणि ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिका आता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. 18 मार्चपासून झी मराठीवर या मालिका पाहायला मिळणार आहे.

‘चला हवा येऊ द्या’ चा शेवटचा भाग कधी?

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचा शेवटचा भाग आज (रविवार) 17 मार्चला रात्री 9.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. ही काही दिवसांची विश्रांती आहे. अल्पविरामानंतर हा कार्यक्रम तुमच्या त्याच लाडक्या टीमसोबत पुन्हा एकदा हसवायला आणि तुमचं मनोरंजन करायला सज्ज होणार आहे, असं झी मराठी वाहिनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

चला हवा येऊ द्याच्या शेवटच्या भागात झी मराठीवरील मालिकांमधील कलाकार उपस्थित असणार आहेत. पारू, शिवा, पुन्हा कर्तव्य आहे आणि नवरी मिळे हिटलरला या मालिकांमधील प्रमुख कलाकार चला हवा येऊ द्या मंचावर उपस्थित असणार आहेत.

कलाकारांनी सोडला कार्यक्रम

आधी सागर कारंडे चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून बाहेर पडला. त्यानंतर आता या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक निलेश साबळे हा देखील बाहेर पडला. वैयक्तिक कारणामुळे आपण कार्यक्रम सोडत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर हा कार्यक्रम बंद होणार असल्याच्या प्रचंड चर्चा झाल्या. आता अखेर अधिकृतपणे चॅनेलच्या वतीने याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.