‘हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे!’ असं म्हणत अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करतो. प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतो.निलेश साबळे ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’हा कलर्स मराठीवर नवीन विनोदी कार्यक्रम घेऊन निलेश साबळे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. या कार्यक्रमात ‘जुनं फर्निचर’ चित्रपटाची टीम पोहोचली. यावेळी प्रचंड धमाल अन् मस्ती झाली. ‘हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे!’ मधील कलाकारांनी सादर केलेल्या स्किटला ‘जुनं फर्निचर’च्या टीमने दाद दिली. एकाच एपिसोडमध्ये या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या नव्या शोचे बरेच प्रोमोज, व्हीडिओज आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत होते. तेव्हापासूनच या शोची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये ओंकार भोजने आणि भाऊ कदम यांच्या विनोदावर ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची संपूर्ण टीम खळखळून हसली होती. आता कोणत्या सिनेमाची टीम या कार्यक्रमात येणार याची उत्सुकता होती.
‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’या कार्यक्रमाचानुकताच दुसरा प्रोमो रिलीझ झाला. या नवीन प्रोमोत निलेश साबळे आणि भाऊ कदम यांच्या विनोदावर ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांच्यासह जुनं फर्निचर चित्रपटाची संपूर्ण टीम धमाल करताना दिसत आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमने चांगलीच धमाल, मजामस्ती केल्याचे व्हीडिओत पाहायला मिळत आहे. निलेश साबळेंचे प्रश्न आणि रोहितच्या उत्तरांवर उपेंद्र लिमेय अन् सचिन खेडेकर खळखळून हसत आहेत. त्यामुळे एकंदरीत या मंचावर जुनं फर्निचरच्या संपूर्ण टीमने धमाल केल्याचं दिसून येत आहे.
‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ च्या या नवीन प्रोमोला चाहत्यांनीही लाईक्स आणि कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला. निलेश साबळेंचा नवीन शो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरलेला दिसत आहे. ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या शोचं लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन डॉ. निलेश साबळे करत आहे. तर भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम व रोहित चव्हाण या कलाकार या कार्यक्रमात दिसत आहेत. शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.