मराठी मालिका विश्वात एक नवा प्रयोग केला जात आहे. मराठी मालिकेत पहिल्यांदाच AI चा वापर केला जात आहे. सोनी मराठी वाहिनीवर नुकताच नव्या मालिकेचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत आणि प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आहेत. ‘तू भेटशी नव्याने’ ही नवी मालिका सोनी मराठीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत पहिल्यांदाच AI चा वापर केला जातोय. या मालिकेत अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री शिवानी सोनार यांची नवी कोरी जोडी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
अभिनेता सुबोध भावे याने याआधी यापूर्वी निरनिराळे गाजलेले चित्रपट, विविध मालिका यांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यांने साकारलेल्या विविध व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांना आवडल्या आहेत. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सुबोध भावे आता काय नवीन घेऊन येणार, अशी चर्चा सगळीकडे रंगत असतानाच सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे सुबोधच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.
सुबोध भावे यांने मालिकेमध्ये पुनरागमन केलं आहे. पुनरागमन म्हटलं तर धमाकेदार सुरुवात हवीच… अशाच प्रकारची भूमिका सुबोध भावे घेऊन आला आहे. सोबतच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री शिवानी सोनार पाहायला मिळणार आहे. शिवानीने आजवर निरनिराळ्या भूमिका साकारल्या आहेत आणि ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता ती सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत झळकणार आहे.
‘तू भेटशी नव्याने’ मालिकेबद्दल आणि या मालिकेच्या प्रोमोबद्दल सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचा पाऊस सोनी मराठी वाहिनी आणि सुबोध, शिवानी यांच्यावर झाला आहे.या प्रोमोत आपल्याला सुबोधच्या दोन व्यक्तिरेखा पाहायला मिळत आहेत. अभिमन्यू आणि माही अशी त्या व्यक्तिरेखांची नावं आहेत. ऐन चाळिशीतील अभिमन्यू सर कॉलेज प्रोफेसरच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर ऐन विशितला तरुण सुबोधही या मालिकेत दिसणार आहे. त्या व्यक्तिरेखेचं नाव माही आहे आणि AI च्या माध्यमातून हा तरुण सुबोध दाखवला जाणार आहे. अशा प्रकारे साकारलेली एक व्यक्तिरेखा दूरचित्रवाणीवर पहिल्यांदाच सादर केली जाणार आहे.
AI चा वापर करून ह्या मालिकेतील व्यक्तिरेखा साकारली जाणार असल्याने ‘तू भेटशी नव्याने’ ह्या मालिकेमुळे मालिका विश्वात वेगळीच चर्चा निर्माण झाली आहे. 25 वर्षांपूर्वीचा सुबोध आणि आत्ताचा सुबोध अशा व्यक्तिरेखा दिसणार आहेत आणि ही एक प्रेमकथाही आहे यांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरेल, असा कलाकारांना विश्वास आहे. ‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका लवकरच सोनी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेबद्दलच्या इतर गोष्टी अजून गुलदस्त्यात आहेत.