सामान्य घरातील मुलगा, रीलस्टार सूरज चव्हाण सध्या बिग बॉस मराठीच्या घरात आहे. ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा आठवडा गुलीगत सूरज चव्हाणने चांगलाच गाजवला आहे. बिग बॉसच्या घरातील त्याच्या खेळाबद्दल बिग बॉस मराठीचा होस्ट रितेश देशमुख याने सूरज चव्हाणचं कौतुक केलं आहे. विकेंड स्पेशल ‘भाऊचा धक्का’वर रितेशने सूरजचं भरभरून कौतुक केलं आहे. सूरज कॅप्टन झालेला नसला तरी या आठवड्यात त्याने बाजी मारली आहे. पहिले दोन आठवडे शांत असणाऱ्या सूरजने तिसरा आठवड्यात कॅप्टनसी टास्कमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्याची खेळी प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली आहे. त्यामुळे रितेशने सूरजचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
बिग बॉस मराठीच्या विकेंड स्पेशल ‘भाऊचा धक्का’वर रितेश देशमुखने सूरज चव्हाण याचं कौतुक केलं. सूरजच्या खेळाचं कौतुक केलं. या आठवड्यात एका हिरोने जन्म घेतला. ज्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलंय त्याचं नाव आहे सूरज चव्हाण… अख्खं घर म्हणतं त्याला गेम कळत नाही. पण या आठवड्यात फक्त सूरजचाच गेम दिसला. त्याने एकट्याने सगळ्यांना टफ फाईट दिली, असं रितेश देशमुख म्हणाला.
झुंड में भेडिये आते हैं और शेर अकेला ही आता है…, असंही रितेश म्हणतो. सूरजच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोणीही खेळू नका. सर्वांना समान न्याय मिळायला हवा. या घरातील सर्व सदस्य समान आहेत. सूरजने एकट्याने बाजी मारली आहे. त्याला कमी लेखू नका… अभिजीत धनंजय, पॅडी तुम्हाला नेहमी सांगतात की घाबरायचं नाही. जसं बोलताय बोला, जसं खेळताय खेळा…, असं रितेश म्हणालाय. यापुढे बिनधास्त खेळण्याचा सल्ला रितेशने सूरजला दिलाय.
सूरजच्या इतर मित्रांना रितेशने सल्ला दिला आहे. अंकिता, धनंजय आणि पॅडी यांना मला सांगायचं आहे की एकदा तुम्ही सूरजला गेम समजावला ना… मग आता त्याला खेळू द्या… त्याला तुम्ही मार्गदर्शन करा, पण कंट्रोल करू नका… महत्वाचं म्हणजे सूरजच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोणीही खेळू नका, असं रितेश म्हणाला आहे.