मुंबई : राजकारणातले दिग्गज आता किचनमध्ये घुसले आहेत. होय.. झी मराठीच्या किचन कल्लाकार (Kitchen Kallakar) या कार्यक्रमात तरुण राजकारणी रोहित पवार(Rohit Pawar), पंकजा मुंडे (Pankaja Munde), प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी हजेरी लावली. केवळ हजेरीच नाही. तर चविष्ट पदार्थही या दिग्गजांनी केले. आता त्याची चव प्रत्यक्ष तर चाखला येणार नसली तरी किचनमधली धमाल मात्र आम्ही तुम्हाला अनुभवायला देणार आहोत. चला पाहू या…
एक से बढकर एक किस्से
अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) या शोमध्ये परीक्षक आहेत. सहभागी झालेल्या किचन कलाकारांना ते गुण देणार आहेत. या आठवड्यातल्या एपिसोडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे सहभागी झाल्या. त्यांनी आपल्या खवय्येगिरीचे एक से बढकर एक किस्सेही यावेळी सांगितले.
‘दुसऱ्या शोमध्ये रॉयल्टी द्यावी लागेल..’
रोहित पवार यांनी चला हवा येवू द्या शो मध्ये हजेरी लावली होती. यावेळी निवेदक संकर्षण कऱ्हाडे यांनी त्यांना सांगितलं, की चला हवा येवू द्या च्या लेखकाला वाटतं तुम्ही वारंवार यावे, यावेळी रोहित पवार म्हणाले, मला बोलवायचं असेल तर रॉयल्टी द्यावी लागेल. यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला.
‘तुम्हाला पाहिलं की टेन्शन येतं’
आज मी उसळ आणि भाकरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. डाळ कच्ची वगैरे राहणार नाही, याची काळजी घेईल. खरंतर तुम्हाला पाहिलं की टेन्शनच येतं. कारण रिझल्ट काय येणार, हे महत्त्वाचं आहे, असं प्रणिती शिंदे प्रशांत दामलेंना यावेळी म्हणाल्या.
‘आधी मी पक्की मांसाहारी होते’
आमच्याकडे ज्योतिर्लिंग असल्यानं किमान श्रावण आम्ही पाळायचो. यावेळी मांसाहार आम्ही करायचो नाही. आधी मी पक्की मांसाहारी होते, मात्र काही वर्षांपूर्वीच नॉनव्हेज सोडलं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी त्यांनी गटारी आमावस्येची एक धमाल आठवणही सांगितली.
झी मराठीच्या किचन कल्लाकारच्या एपिसोड सात आणि आठमध्ये ही धमाल अनुभवायला मिळणार आहे. यावेळी सहभागी कल्लाकार किचनमधल्या विविध खेळातही सहभागी होणार आहेत.
(व्हिडिओ सौजन्य – झी मराठी)