छोटा पुढारी घन: श्याम दरवडे ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर पडला. त्यानंतर आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात बॉडीबिल्डर संग्राम चौगुलेची एन्ट्री झाली आहे. त्याला घरातल्या पहिल्या दिवसापासूनच अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. त्याचा पहिला दिवसच टास्कपासून सुरू होणार आहे. पहिल्याच दिवशी टास्कमध्ये सदस्यांसोबत वाद घालताना संग्राम दिसून येईल. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज जादुई विहिरीत कोण पडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच पहिल्याच दिवशी संग्राम चौगुलेने निक्की तांबोळीशी पंगा घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
‘बिग बॉस मराठी’ च्या नव्या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत,”या जादुई विहिरीत असे काही सदस्य पडतील जे अपात्र आहेत”. त्यानंतर संग्राम जादुई विहिरीत निक्कीला पडायला सांगतो. पण मेडिकल कंडिशनचं कारण देत निक्की विहिरीत पडायला नकार देते. दरम्यान संग्राम निक्कीला जादुई विहिरीत ढकलतो. संग्रामने घरात आल्या आल्या निक्कीसोबत घेतलेला पंगा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. नेटकऱ्यांनी संग्रामच्या कृतीचं समर्थन केलं आहे. तसंच निक्कीशी कुणीतरी भिडायला पाहिजे, ते तू करतो आहेस, असं नेटकरी म्हणत आहेत.
संग्राम निक्कीशी भिडल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याचं समर्थन केलं आहे. खतरनाक संग्रामभाऊ…, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. हेच तर पाहिजे होतं… आणि हे फक्त संग्रामने करून दाखवलं. पहिल्याच दिवशी मन जिंकलस भावा… जबरदस्त, असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. खतरनाक चौघुले सर निक्कीला चांगला धडा शिकवलात, अशीही कमेंट करण्यात आली आहे.
अंकिता आणि धनंजयमधलं संभाषणही सध्या चर्चेत आहे. डीपी दादा तुम्ही नॉमिनेशनमध्ये होतात तेव्हा एक वाक्य बोलला होतात विश्वासाबद्दल. मला पलटणारी लोक आवडत नाहीत. मी जेव्हा घरातून जाणार होते तेव्हा मी अभिजीतला म्हणाले होते, ‘स्टँड घे.. पलटू नको’, असं अंकिता धनंजय पोवारला म्हणते. त्यावर डीपी तिला उत्तर देतो.हा ग्रुप सगळ्यात पहिला घाव तुझ्यावर आणि माझ्यावर घालणार आहे, असं डीपी म्हणतो.