काही मालिका या प्रेक्षकांच्या मनात घर करतात. त्या मालिकांची कथा प्रेक्षकांना आपलीशी वाटते. मालिकेतील पात्र जणू आपल्याच कुटुंबातील आहेत, असं प्रेक्षकांना वाटू लागतं. अशीच मालिका म्हणजे झी मराठीवरील ‘सावळ्याची जणू सावली’… या मालिकेतील पात्र प्रेक्षकांना आपलीशी वाटतात. या मालिकेची प्रेक्षकांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे. आता ‘सावळ्याची जणू सावली’ मालिका नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. सावली आणि सारंग यांचं लग्न झालं आहे. आता त्यानंतर या मालिकेत नवं वळण आल्याचं पाहायला मिळत आहे.
‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत लग्नानंतर सावलीच पूर्ण विश्वच बदललं आहे. आता भैरवी सोबत तिला तिलोत्तमाचा ही सामना करायचा आहे. एकीकडे भैरवी आणि तारा चिंतेत आहेत कारण त्यांना गाण्याच्या काही संध्या गमवाव्या लागल्या आहेत. त्याचबरोबर, जगन्नाथकडे त्यांचा व्हिडिओ आहे आणि तो परत कसा मिळवायचा याची त्यांना चिंता लागली आहे. अश्या परिस्थितीत, भैरवी सावलीला भेटते आणि तिच्या वचनाची आठवण करून देते.
सारंग लग्नानंतर पहिल्यांदाच घरातून बाहेर जाणार असतो, पण तिलोत्तमाच्या सल्ल्यानुसार तो थांबतो. ऐश्वर्या त्याला अस्मीची आठवण करून देते, ज्यामुळे त्याच्या मनात सावलीच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका निर्माण होते. सावली पुन्हा सासरी परत आल्यामुळे तिलोत्तमाला राग येतो आणि ती घर सोडून निघून जाते. ऐश्वर्या सावलीला स्वयंपाकघरात ठेवते, घरात असं ठरवलं जातंय की सावलीच्या कुटुंबातील कोणीही लग्नाच्या रिसेप्शनसाठी येणार नाही, ज्यामुळे सावली निराश होते.
ऐश्वर्या भैरवीला रिसेप्शनसाठी गाण्याच्या कार्यक्रमाबद्दल कळवते. सावलीवर दबाव असूनही, भैरवी ठामपणे सांगते की सावलीला कार्यक्रमात गाणे गावे लागेल. रिसेप्शनसाठी अमृता सावलीला पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाखात नटवणार आहे. सावलीचा हा पारंपरिक लूक प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेतो. रिसेप्शनमध्ये सावली तिच्या कुटुंबाचा सन्मानाने उल्लेख करते आणि तीव्र आत्मविश्वासाने आपली बाजू मांडते.
रिसेप्शनच्या तयारीदरम्यान, ऐश्वर्या सावलीवर कानातले चोरीचा आरोप करते. घरातील सगळ्यांसमोर तिची चौकशी केली जाते. सावली सरळ उत्तर देते, “जर मी चोर नाही हे सिद्ध होणार नसेल, तर मी इथे राहणार नाही.” सावली ऐश्वर्याच्या जाळ्यात अडकेल? रिसेप्शन मध्ये पारंपारिक लूक पाहून सर्वजण काय म्हणतील? हे पाहावं लागणार आहे.