स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर आता दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. स्टार प्रवाह वाहिनीने नवनव्या कलाकृती सादर केल्या आहेत. त्यामुळेच स्टार प्रवाहच्या मालिका आणि त्यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. स्टार प्रवाह परिवारात लवकरच नवी मल्टीस्टारर मालिका लग्नानंतर होईलच प्रेम! दाखल होतेय. मालिकेच्या शीर्षकावरुनच मालिकेची गोष्ट काय असेल याचा अंदाज येतो. तू ही रे माझा मितवा ही मालिकादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात असं म्हणतात. ज्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करतो तीच व्यक्ती आयुष्यभर जोडीदार म्हणून लाभायला नशिब लागतं. मात्र प्रत्येकाच्याच नशिबात हे सुख नसतं. नात्यातल्या या हळुवार धाग्याची गोष्ट म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका. जवळपास ४ वर्षांनंतर मृणाल दुसानिस या मालिकेतून पुनरागमन करणार आहे.
मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे, विजय आंदळकर, अविनाश नारकर, ऋजुता देशमुख, कश्मिरा कुलकर्णी, अनुष्का पिंपुटकर, प्रसन्न केतकर, संयोगिता भावे, आभा वेलणकर, विशाल कुलथे, श्रेयस कदम, स्नेहल चांदवडकर अश्या अनेक दमदार कलाकारांची फौज या मालिकेत आहे. १६ डिसेंबरपासून सायंकाळी ७ वाजता ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
लग्नानंतर होईलच प्रेम प्रमाणे अर्णव आणि ईश्वरीच्या प्रेमाची गोष्ट देखिल भेटीला येणार आहे. मालिकेचं नाव आहे तू ही रे माझा मितवा. या मालिकेतल्या अर्णव आणि ईश्वरी या दोघांची प्रेम कहाणी थोडी हटके आहे. एकमेकांच्या प्रेमात ते जितके बुडाले आहेत तितकेच ते एकमेकांचा तिरस्कारही करतात. म्हण्टलं तर एकमेकांशिवाय जगता येत नाही आणि म्हटलं तर एकमेकांसोबत रहाताही येत नाही.
थोडक्यात प्रेम करुन कात्रीत सापडलेल्या अर्णव आणि ईश्वरीची हटके लव्हस्टोरी म्हणजे तू ही रे माझा मितवा ही मालिका. कुन्या राजाची गं तू रानी मालिकेतून घराघरात पोहोचलेली गुंजा म्हणजेच अभिनेत्री शर्वरी जोग आणि अभिनेता अभिजीत आमकर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसतील. तू ही रे माझा मितवा २३ डिसेंबरपासून रात्री १०.३० वाजता भेटीला येणार आहे.