बिग बॉस मराठीच्या घरात सध्या वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत. नुकतंच बिग बॉसच्या घरातील सदस्यांना त्यांच्या जवळच्या व्यक्तींना फोन लावायला सांगितला होता. हा जादुई फोन आहे. यातून तुम्ही कुणालाही फोन लावू शकता असं सांगण्यात आलं होतं. यावेळी रीलस्टार सूरज चव्हाण याने त्याच्या आई वडिलांना फोन लावला होता. सूरजचे आई-बाबा या जगात नाहीयेत. मात्र या जादुई फोनने त्याने आई- वडिलांपर्यंत मनातील भावना पोहोचवल्या आहेत. आई- बाबा तुम्ही मला सोडून का गेलात? तुमची मला खूप आठवण येते, असं सूरज यावेळी म्हणाला.
बिग बॉसच्या घरातून सूरज चव्हाण याने त्याच्या आई वडिलांना फोन केला. यावेळी मनातील भावना त्याने व्यक्त केल्या. आई- अप्पा तुमची आठवण येतेय. तुम्ही मागचा पुढचा विचार का नाही केला…. तुमच्या बाळाचा माझा विचार का नाही केला? कोण त्याला सांभाळेल? त्याच्याकडे कोण बघेन? असं कसं काय तुम्ही मला सोडून गेलात? एकटं पडलंय तुमचं बाळ… आई कशी गं सोडून गेलीस तू मला… लय आठवण येतीय तुमची… मला रक्ताच्या उलट्या व्हायच्या. तुझी आठवण यायची… आता तुमच्या बाळाकडे कोण बघणार आई…, असं सूरज म्हणाला.
आई तू का गेलीस… आता किती चांगलं झालंय सगळं… आपण सगळे किती ऐशमध्ये राहिलो असतो. आता तू नाहीस तर मी किती एकटा पडलो आहे आई… असं सोडून जाययं होतं तर मला जन्मच द्यायचा नव्हता… मला दम लागतो, मला किती त्रास होतो… मला जवळ घ्यायला कुणी नाही. तू माझ्या डोक्यावरून हात फिरवायची मला किती बरं वाटायचं… पण कुणीच डोक्यावरून हात फिरलायलाच कुणी नाही. आता मला कुणीच नाही… तुमची खूप जास्त आठवण येतेय, असं सूरज म्हणाला. यावेळी तो भावनिक झाला होता.
सूरजचा हा फोन ऐकून बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांच्या डोळ्यातही पाणी आलं होतं. सूरजचा हा फोन कॉलचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करताच नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करत सूरजला पाठिंबा दिला आहे. तुझे शब्द मनाला लागतात… अख्खा महाराष्ट्र तुझ्यासोबत आहे, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर हा व्हीडिओ पाहून डोळ्यात पाणी आलं, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.