‘तेंडल्या’ चित्रपटाच्या पडद्यामागची 1 कोटी 70 लाखांची गोष्ट, पुरस्कार मिळाल्यानंतरही कलाकार शेतात का राबतात?

| Updated on: May 13, 2021 | 12:26 AM

सांगलीतील काही मित्रांनी ‘तेंडल्या’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. (tendlya marathi film corona pandemic)

तेंडल्या चित्रपटाच्या पडद्यामागची 1 कोटी 70 लाखांची गोष्ट, पुरस्कार मिळाल्यानंतरही कलाकार शेतात का राबतात?
TENDLYA MARATHI MOVIE
Follow us on

सांगली : चित्रपटाचं वेड हे कधीकधी कुठे नेऊन ठेवेन हे सांगता येत नाही. सांगलीतील काही मित्रांनी असाच एक चित्रपट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उसनवारी तसेच कर्ज घेऊन ‘अश्वमेध मोशन पिक्चर्स’ संस्थेच्या माध्यमातून ‘तेंडल्या’ या मराठी चित्रपटाची (Tendlya marathi film) निर्मिती केली. या चित्रपटाला पाच राज्य आणि एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मात्र, या चित्रपटालासुद्धा कोरोनाने गिळंकृत केलं. या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, कला दिग्दर्शकासह काही कालकार कोरोनाच्या आर्थिक संकटात सापडले आहेत. उसनवारी रक्कम आणि कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी त्यांच्यावर शेतात राबण्याची वेळ आली आहे. ते सांगलीच्या शिराळा तालुक्यातील साडेपाच एकर पडीक शेतीत काम करत आहेत. ही जमीन कराराने घेऊन चित्रपट निर्मितीसाठी घेतलेले 1 कोटी 70 लाख रुपये फेडण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पोटासाठी आणि देणं फेडण्यासाठी त्यांची सध्या धडपड सुरू आहे. (Tendlya marathi film production team of eight friends working in Sangli farm due to Corona pandemic)

चित्रपट प्रदर्शित होणार तोच कोरोना आला

चित्रपट व्यवसायात उतरलेल्या वाळवा तालुक्यातील सामान्य कुटुंबातील आठ तरुणांनी पैशांची जुळवाजुळव करुन तेंडल्या चित्रपटाची निर्मिती केली. 24 एप्रिल 2020 रोजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांच्या वाढदिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. त्यासाठी सर्व तयारी करण्यात आली होती. मात्र, त्याचवेळी कोरोनाचे संकट जगावर पसरले. भारत आणि महाराष्ट्रातही त्यांचे गंभीर परिणाम झाले. अजूनही स्थिती फार सुधारलेली नाही. उलट कोरोनाची दुसरी लाट गंभीर वळणावर आली आहे. त्यामुळे चित्रपटासाठी राबलेल्या साऱ्यांचे स्वप्नेच धुळीला मिळाली. कोरोनामुळे या चित्रपटाच्या टीमवर गंभीर संकट आलं आहे.

शेतात काम करायचं तिथेच झोपायचं

कोरोनामुळे चित्रपटावर संकट आल्यामुळे या आठ तरुणांसमोर सध्या मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. कर्जाचे हप्ते आणि उसनवारी फेडण्यासाठी हे आठही तरुण बिऊर फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील साडेपाच एकर शेती कराराने करत आहेत. शेतात असणारी आंब्याची झाडं त्यांचं निवासस्थान आहे. स्वयंपाक करायचा. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत शेतात राबायचे, असा त्यांचा दिनक्रम आहे. चित्रपटासाठी घेतलेली कर्जावू रक्कम वेळेत परत करायची हा एकच ध्यास घेवून सध्या सारेजण काम करीत आहेत.

या तरुणांनी शेतात पीक घेताना झिरो बजेट आणि तत्काळ पैसे देणारा भाजीपाला निवडला आहे. घेतलेल्या साडेपाच एकरापैकी दीड-दोन एकर क्षेत्रच पेरण्यायोग्य होते. बाकी पडीक होते. या तरुणांनी मागील वर्षीच्या डिसेंबरमध्ये शेत ताब्यात घेतले. सुरुवातीला मेथी, कोथिंबीरीची एका एकरात लागवड केली. आता गवार, भेंडी, पावटा, वांगी, टोमॅटो अशी भाजीपिके त्यांनी घेतली आहेत. परिस्थितीवर मात कशी करायची याचे उदाहरण म्हणून सचिन तेंडूलकर यांचाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांची वाटचाल सुरू आहे.

सचिन तेंडुलकर त्यांचा आदर्श

सचिन तेंडूलकर आणि क्रीडा पत्रकार सुनंदन लेले हे या सर्वांचे आदर्श आहेत. ‘तेंडल्या’ चित्रपटाची निर्मिती सचिन जाधव आणि चैतन्य काळे यांनी केली आहे. साताराचे सुभाष जाधव कला दिग्दर्शक आहेत. हे तिघेही उच्चशिक्षित आहेत. महादेववाडीचे तानाजी केसरे प्रॉडक्शन मॅनेजर आहेत.

चित्रपटात कलाकार कोण आहेत ?

चित्रपटातील कलाकार 11 वी 12 वी पर्यंतचे शिक्षण सुरू असलेले आहेत. सर्वजण चित्रपटातील नावानेच ओळखले जाताहेत. ऐतवडे बुद्रुकच्या ओंकार गायकवाडला चित्रपटातील ‘पोप्या’, ठाणेच्या स्वप्नील पाडळकरला ‘इंजान’, तांबवेच्या राज कोळीला ‘बारका आज्या’ महादेव वाडीच्या हर्षद केसरेला ‘जॉनट्यां’, देवर्डेच्या महेश जाधवला ‘जयसूर्या’ तर वाळव्याच्या आकाश तिकोटीला डीपी अशी त्यांची नावे पडलीयेत.

भविष्यात नक्कीच षटकार मारू

दरम्यान, सध्या कोरोना असल्यामुळे चित्रपट तसेच शेती व्यवसायावर वाईट दिवस आले आहेत. मात्र, कर्ज फेडण्यासाठी संचारबंदीतही हे सर्वजण फिरून भाजी विकत आहोत. कोरोनाचे संकट किती काळ चालणार माहिती नाही. या संकटानंतर चित्रपटगृहे सुरू होतील अशी त्यांची आशा आहे. त्यामुळे सध्या कर्ज फेडण्यासाठी शेतात राबावे लागणार आहे. मात्र, जेव्हा चित्रपटगृहे सुरु होतील त्यावेळी मात्र आम्ही षटकार मारू असा विश्वास या तरुणांमध्ये आहे.

इतर बातम्या :

Photo: केप टाऊनच्या समुद्र किनारी निक्की तांबोळीची धम्माल, दिसली हॉट अवतारात

Genelia Deshmukh: मुलाला कोरोनाची लागण; आई म्हणून जेनेलियाला काय वाटलं?; व्हिडीओतून केलं मन मोकळं

Mukesh Khanna Death Hoax | ‘शक्तीमान’चा कोरोनाने बळी घेतल्याच्या अफवा, अभिनेते मुकेश खन्ना म्हणतात…

(Tendlya marathi film production team of eight friends working in Sangli farm due to Corona pandemic)