आज 2 नोव्हेंबर बॉलिवूडच्या किंग खानचा 59 वा वाढदिवस. दरवर्षी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी, शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी लाखो फॅन्स येतात. काहीजण तर दोन-दोन दिवस आधीच मन्नत बाहेर येऊन बसलेले असतात. त्यांना फक्त आपल्या लाडक्या अभिनेत्याची एक झलक हवी असते. त्याला भरभरून शुभेच्छा आणि आशिर्वाद द्यायचे असतात. दरवर्षी शाहरूख मन्नत बाहेर येऊन त्या जाळीदार बाल्कनीमधून आपल्या चाहत्यांना भेटतो. त्यांचे आभार मानतो. पण यंदा हे सर्व चुकल्यासारखं वाटतं आहे. कारण किंग खानचा यंदाचा वाढदिवस त्याच्यासाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठीही फार वेगळा ठरला आहे.
किंग खानचा यंदाचा वाढदिवस शांततेत
दरवर्षी किंग खानच्या वाढदिवसादिवशी शाहरुख नेहमीप्रमाणे त्याच्या घराच्या ‘मन्नत’च्या टेरेसवर येतो आणि हात उंचावून सर्वांना अभिवादन करतो. शिवाय हात पसरून त्याची आयकॉनिक पोजही देतो, त्यावेळी किंग खानला पाहून जमाव वेड्यासारखा ओरडताना दिसतो. या क्षणाचे अनेक फोटो-व्हिडिओ व्हायरलही होतात. हे नेहमी त्याच्या वाढदिवसाला असणारे चित्र आहे. पण यंदा मात्र किंग खानचा वाढदिवस चाहत्यांच्या गराड्यात होणार नाही.
पहिल्यांदाच असं झालं असेल की शाहरूखला त्याचा वाढदिवस चाहत्यांविनाच साजरा करावा लागणार आहे. यावर्षी ना गिफ्टस्, ना चाहत्यांचा गराडा, ना शाहरुखची झलक. असेच चित्र असणार आहे. एरवी लाखों चाहत्यांच्या गर्दीने गजबजलेला मन्नतचा रस्ता आज सामसूम आणि शांत-शांतच असणार आहे.
मन्नत बाहेर जमण्यास पोलिसांची सक्त मनाई
शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याचे चाहते मन्नत बाहेर आले होते. पण जमलेल्या हजारोंच्या गर्दीला पोलिसांनी हटवलं आहे. तसेच सकाळपासून मन्नतबाहेर उभं राहण्यास कुणालाही परवानगी नाही. सुरक्षेच्या कारणास्तव शाहरुखच्या चाहत्यांना मन्नतच्या बाहेर उभे राहण्याची परवानगी दिली जात नसल्याची माहिती समोर आलीये.
तसेच शाहरूख मन्नत बाहेरही पडणार नाहीये. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता बॉलिवूड सेलिब्रेटी आणि पोलीस प्रशासनही सतर्क झालं आहे. कारण बाबा सिद्दीकी यांचं सलमान खान सोबतचं नातं चांगलं असल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचं बिश्नोई गँगने सांगितलं आहे. त्यामुळेच शाहरुख खान आज मन्नत बाहेर पडणार नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.
यंदाचा वाढदिवस चाहत्यांविनाच
त्यामुळे दरवर्षीप्रमाणे जसा शाहरुख त्याच्या वाढदिवसाला मन्नत बाहेर येऊन त्याच्या चाहत्यांना तो झलक देतो तसा तो यंदाच्या वर्षी येणार नाही. नाही चाहत्यांना त्याला पाहता येणार आहे. कारण पोलिसांनीच त्यासाठी परवानगी नाकारली आहे. सकाळी 9.30 वाजल्यापासून मन्नत बाहेरुन गर्दी हटवण्यास पोलिसांनी सुरुवात केलीये. त्यामुळे सध्या मन्नत बाहेर शांतता दिसून येत आहे.