मुंबई : ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून लोकप्रिय झालेली टीव्ही अभिनेत्री ऋचा आपटे हिने लगीनगाठ बांधली. ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेता क्षितीज दातेसोबत विवाहबंधनात अडकली. पुण्यात छोटेखानी समारंभात दोघं लग्नाच्या बेडीत अडकले. ऋचा आणि क्षितीज यांचा गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाला होता. (Tujhyat Jeev Rangla Fame Actress Rucha Apte ties Knot with Mulshi Pattern Actor Kshitij Date)
लॉकडाऊनच्या काळात अनेक मराठमोळे सेलिब्रिटी लग्नाच्या बोहल्यावर चढले. सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक, नेहा पेंडसे, सई लोकूर यासारख्या चित्रपट तारकांपासून शर्मिष्ठा राऊत, अर्चना निपाणकर, तेजपाल वाघ, अभिज्ञा भावे, कार्तिकी गायकवाड यासारख्या छोट्या पडद्यावरील कलाकारांनीही दोनाचे चार हात केले. यामध्ये आता कलाकार जोडप्याची भर पडली आहे.
पुण्यात ऋचा-क्षितीजचा विवाह
रविवार 25 एप्रिलच्या मुहूर्तावर ऋचा आणि क्षितीज यांचा विवाह संपन्न झाला. ऋचा आणि क्षितीज गेल्याच वर्षी लग्नाच्या बेडीत अडकणार होते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लग्न पुढे ढकललं होतं. अखेर पुढे ढकललेल्या मुहूर्तालाही लॉकडाऊनची पार्श्वभूमी होतीच. त्यामुळे मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांनी लगीनगाठ बांधली. कोव्हिडसंबंधी सर्व नियमांचे पालन करुन हा विवाह सोहळा संपन्न झाला.
साखरपुड्याचा फोटो :
ऋचा आपटेच्या गाजलेल्या भूमिका
ऋचा आपटेने झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या प्रसिद्ध मालिकेत प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती. सध्या ती सोनी मराठी वाहिनीवरील ‘अस्सं माहेर नको गं बाई’ या मालिकेत मुक्ता उपासने ही व्यक्तिरेखा साकारते. प्रशांत दामले यांच्यासोबत ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकाचे अनेक प्रयोग तिने केले आहेत. ‘मारवा’ या आगामी मिनी सीरीजमध्येही ती दिसणार आहे.
बन मस्का मालिकेत जोडी गाजली
क्षितीज दाते आणि ऋचा आपटे यांची जोडी ‘झी युवा’ वाहिनीवर गाजलेल्या ‘बन मस्का’ मालिकेत एकत्र झळकली होती. त्यांनी अनेक नाटकांमध्ये एकत्र काम केलं आहे. क्षितीजने प्रवीण तरडेची भूमिका असलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील गण्या या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातही क्षितीज दिसणार आहे.
संबंधित बातम्या :
अभिनेत्री मानसी नाईकच्या साखरपुड्याचे फोटो
अभिनेत्री सई लोकूर आणि तिर्थदीप रॉय यांची अनोखी ‘डिजिटल लग्नपत्रिका’!
(Tujhyat Jeev Rangla Fame Actress Rucha Apte ties Knot with Mulshi Pattern Actor Kshitij Date)