Tunisha Sharma Death : अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येनंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. एवढ्या कमी वयात अभिनेत्रीने इतका टोकाचा निर्णय का घेतला? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. बॉयफ्रेंड शीजान खानच्या (Sheezan Mohammed Khan) सोबत असलेल्या नात्यात आलेल्या वळणामुळे तुनिशा तणावाखाली होती आणि म्हणून अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचं कारण समोर येत आहे. तुनिशा आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शीजान खानला वसई न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस चौकशीत विचारणार ‘हे’ प्रश्न
शीजान आणि तुनिशा यांच्यामध्ये नक्की कोणत्या कारणामुळे वाद झाले होते? याबाबत पोलिसांना आरोपीची चौकशी करायची आहे. न्यायालयात सुनावणीदरम्यान पोलिसांनी सांगितलं, शीजनचा मोबाईल एफएसएलकडे पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी आणखी काही इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अभिनेत्रीच्या आईने आत्महत्येनंतर केलेल्या आरोपांनंतर शीजानला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर रात्री शीजानला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीजान चौकशीला सहयोग करत नाही. विचारण्यात आलेल्या प्रश्नांची शीजान उलटसुलट उत्तरं देत आहे. शीजानमुळेच तुनिशाने आत्महत्या केली असल्याचा आरोप अभिनेत्रीची आई करत आहे.
तुनिशा आणि शीजान एकमेकांना डेट करत होते. पण 15 दिवसांपूर्वी तुनिषाला कळालं की शीजान एका अन्य मुलीला देखील डेट करत आहे. यानंतर तुनिशा आणि शीजाय यांच्यात वाद सुरु झाल्याची माहिती तुनिषाच्या जवळच्या व्यक्तींनी दिली.
या घटनेमुळे तुनिषा प्रचंड तणावात होती. यामुळे अभिनेत्रीला पॅनीक अटॅक देखील आला होता. ज्यानंतर तुनिशाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयातच तुनिशाने शीजन करत असलेल्या फसवणुकीची माहिती कुटुंबीयांना दिली होती. असा कुटुंबीयांचा दावा आहे.
तुनिषाने बॉयफ्रेंड शीजानच्या मेकअपरूममध्ये गळफास घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे. आता या प्रकरणी पुढे कोणतं सत्य समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.