मुंबई : अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीतही कामाला वेग आला आहे. आगामी ‘रूप नगर के चीते’ (Roop Nagar ke cheetey)या लक्षवेधी शीर्षक असलेल्या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पुण्यात संपन्न झाला. बॅालिवुडमधील सुप्रसिद्ध फिल्ममेकर विपुल अमृतलाल शाह यांचे पुतणे संगीतकार मनन शाह यांनी ‘एस एंटरटेन्मेंट’च्या बॅनरखाली ‘रूप नगर के चीते’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन विहान सूर्यवंशी करत आहेत. नुकतीच पुणे शहर आणि परिसरात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे (Upcoming marathi film Roop Nagar ke cheetey shooting started).
‘रूप नगर के चीते’ हा चित्रपट दोन बालमित्रांचा रोमहर्षक प्रवास असणार आहे. आणि या चित्रपटाची कथा एका घटनेनंतर त्यांचं दोन भिन्न शहरांतील विरोधाभासी जीवन दर्शवणार आहे. मैत्रीतील आजवर कधीही न उलगडलेले काही दुर्लक्षित पैलू या चित्रपटाच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहेत. हटके शीर्षक असलेल्या या चित्रपटाचे उत्कंठावर्धक पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटातील दोन मध्यवर्ती व्यक्तिरेखेच्या भूमिका पडद्यावर कोण साकारणार? याबद्दल औत्सुक्य निर्माण झाले आहे. 2021च्या अखेरीस ‘रूप नगर के चीते’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
बॉलिवूड मधील अरजित सिंग, आतीफ असलम, राहत फतेह अली खान, अरमान मलिक यांसारख्या आघाडीच्या गायकांसोबत मनन शाह यांनी संगीतकार म्हणून काम केले आहे. ‘अखियाँ मिलावांगा’, ‘तेरे लिये’, ‘सावन बैरी’ यांसारखी बॉलीवूडमधील अनेक हिट रोमँटिक गाणी मनन शाह यांनी संगीतबद्ध केली आहेत. ज्येष्ठ लेखक, गीतकार जावेद अख्तर यांच्यासोबतही ही त्यांनी खूप काम केले आहे.
बॉलिवूडचे हिट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या ‘स्कूल, कॉलेज आणि लाईफ’ या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केलेल्या युवा दिग्दर्शक विहान सूर्यवंशी यांनी ‘रूप नगर के चीते’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मनन शाह आणि विहान सूर्यवंशी ही जोडगोळी मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवायला सज्ज झाली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा व रोमांचक अनुभव असेल असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला आहे.
राधिका, शनाया आणि गुरुनाथ घेणार प्रेक्षकांचा निरोप; ‘या’ दिवशी मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार