संगीताच्या दुनियेतील उस्ताद, तबल्याच्या तालाने सर्वांनांच मंत्रमुग्ध करणारे , पद्मविभूषण उस्ताद झाकिर हुसेन यांच्या निधनाने केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात शोककळा पसरली आहे. सॅन फ्रान्सिस्को येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संगीत विश्वातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी 2002 मध्ये पद्म आणि 2023 मध्ये पद्म विभूषण पुरस्काराने झाकिर हुसेन यांना गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या निधनामुळे सर्व स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
झाकिर हुसेन यांनी खूप लहान वयापासूनचे तबला वाजविण्यास सुरूवात केली होती. तबलावादनातच करिअर करताना त्यांनी आपलं संपूर्ण जीवन या कलेसाठी समर्पित केलं होतं. संगीत क्षेत्रात त्यांनी जे योगदान दिलं ते कोणीच विसरू शकत नाही. मात्र संगीत क्षेत्राव्यतिरिक्त त्यांनी काही चित्रपटांतही काम केलं आणि ते मोठ्या पडद्यावर झळकले. एवढंच नव्हे तर ‘मुगल ए आजम’ या गाजलेल्या चित्रपटातही त्यांना एक रोल ऑफर झाला होता. चला जाणून घेऊया त्यांची फिल्मोग्राफी..
झाकिर हुसेन यांचा डेब्यू
उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील उस्ताद अल्लारखा हे देखील प्रसिद्ध तबलावादक होते. 1983 साली आलेल्या ‘हीट अँड डस्ट’ नावाचा एक हॉलिवूडमधील चित्रपट रिलीज झाला, त्याच चित्रपटाद्वारे झाकिर हुसेन यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात दिवंगत अभिनेते शशी कपूर यांची देखील भूमिका होती. विख्यात अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासहदेखील झाकिर हुसेना यांनी एका चित्रपटात काम केलं, तो चित्रपट म्हणजे ‘साज’. 1997 साली आलेल्या या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती.
एवढंच नव्हे तर 2021 साली आलेल्या ‘चालीस चौरासी’ या चित्रपटातही झाकिर हुसेन झळकले होते. तसेच यावर्शी प्राइम व्हिडीओवर आलेल्या देव पटेल यांच्या ‘मंकी मॅन’ या चित्रपटातही त्यांची भूमिका होती. या चित्रपटात ते तबला मेस्ट्रो म्हणूनच झळकले.
‘मुगल ए आजम’ मध्ये ऑफर झाला होता हा रोल
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात ऐतिहासिक चित्रपट ‘मुघल-ए-आझम’मध्ये काम करण्याची ऑफरही झाकीर हुसैन यांना मिळाली होती. दिलीप कुमार, पृथ्वीराज कपूर, मधुबाला यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात दिलीप कुमार यांनी सलीमची भूमिका साकारली होती, तर झाकीर हुसेन यांना सलीमच्या धाकट्या भावाची भूमिका ऑफर झाली होती. मात्र त्यांनी ती ऑफर नाकारली. खरंतर झाकिर हुसैन यांनी फक्त संगीतावर फोकस करावे, अशी त्यांच्या वडिलांची उस्ताद अल्लारखा यांची इच्छा होती. वडिलांकडून परवानगी न मिळाल्याने झाकिर हुसैन यांनी ‘मुगल ए आजम’ चित्रपटात काम करण्यास नकार दिला.