मुंबई : नितीन चंद्रकांत देसाई…हे नाव समोर आलं की डोळ्यासमोर मोठमोठे सेट, ऐतिहासिक दाखले देणाऱ्या वास्तू उभ्या राहतात. नितीन देसाई यांनी आपल्या कतृत्वाने सिनेसृष्टीत नावलौकिक मिळवला होता. त्यांच्या अचानक अशा जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. कर्जतच्या एन.डी. स्टुडिओत त्यांनी आपलं आयुष्याचा शेवट केला. त्यांच्या जाण्याची बातमी सर्वदूर् पसरल्यानंतर सिनेसृष्टी, सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. नितीन देसाई यांनी अचानक इतका टोकाचा निर्णय का घेतला असावा? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पोलीस तपासात हळूहळू या बाबी उघड होतील. तत्पूर्वी त्यांच्या जवळच्या मित्रांकडून याबाबत काही माहिती समोर आली आहे.
“नितीन देसाई गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत होते. त्यासाठी ते माझ्याकडे आले होते. कर्ज फेडण्यासाठी त्यांना आणखी कर्जाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तसेच कोविड काळात स्टुडिओ बिझनेस कमी झाला होता आणि बरेचसे शूट्स मुंबईतच होत होते. त्यामुळे त्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं.”, असं फेडरेशन ऑफ वेस्टरन्न इंडिया सिने इम्प्लॉयीचे सदस्य बीएन तिवारी यांनी ई टाईम्ससोबत बोलताना सांगितलं.
नितीन देसाई यांच्या जवळचे आणि त्यांना चांगल्या प्रकारे ओळखणारे रंगराव चौगुले यांनीही त्यांच्याबाबत ई टाईम्सला माहिती दिली. “मी कालच त्यांच्य़ाशी बोललो होतो आणि त्यांनी सांगितलं की मी दिल्लीत असून मुंबईत परतणार आहे. पण आता त्यांनी असं का केलं ते माहिती नाही.”
नितीन देसाई यांच्या निधनानंतर आमदार महेश बालदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. “आम्ही महिन्याभरापूर्वी भेटलो होतो. त्यांनी सांगितलं की आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं. नवीन चित्रपट शूटसाठी येणार आहे. पण एनडी स्टुडिओत टीव्ही शोचंच शूटिंग होत होतं. त्याने आर्थिक अडचण काही दूर झाली नाही.”, असं आमदार महेश बालदी यांनी सांगितलं.
नितीन देसाई यांनी काही वर्षांपूर्वी एका कंपनीकडून 180 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. कर्जाची परतफेड करणं कठीण झालं होतं. यासाठी त्यांनी जमिन आणि मालमत्ता तारण ठेवली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मानसिक त्रासात होते अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.