Adipurush | आदिपुरूषवरून ‘रामायण’, चारी बाजूंनी घेरलेल्या मनोज मुंताशिर यांनी केली पोलीस सुरक्षेची मागणी

| Updated on: Jun 19, 2023 | 4:19 PM

‘आदिपुरुष’ हा चित्रपट मोठ्या वादात सापडला असून सोशल मीडियावरही प्रचंड ट्रोलिंग होत आहे. या चित्रपटातील काही संवाद लोकांना खटकले असून त्यावरून मोठे रामायण सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संवादलेखक मनोज मुंतशीरने मोठे पाऊल उचलले आहे.

Adipurush | आदिपुरूषवरून रामायण, चारी बाजूंनी घेरलेल्या मनोज मुंताशिर यांनी केली पोलीस सुरक्षेची मागणी
लेखकाने केली पोलीस सुरक्षेची मागणी
Follow us on

मुंबई : ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटावरून सध्या मोठे ‘रामायण’ सुरू झाले आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाबद्दल प्रचंड ट्रोलिंग (trolling on social media) सुरू असून हा चित्रपट म्हणजे रामायण कसं दाखवू नये याचं उदाहरण असल्याचे टीकास्त्र अनेकांनी सोडलं आहे. चित्रपटातील संवाद अथवा डायलॉग्सबाबत (dialogues)  देशभरात अनेक निदर्शने होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांनी मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी मुंबई पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे.

चित्रपटावरून सुरू असलेल्या या सर्व गदारोळात लेखक मनोज मुंतशीर यांनी स्वत:ला धोका असल्याची भीती व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. मुंतशीर यांच्या अर्जावर विचार करून मुंबई पोलीस सुरक्षा देण्याबाबत निर्णय घेणार आहेत.

खरंतर, प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ हा चित्रपट १६ जून रोजी देशभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. हा चित्रपत बॉक्स ऑफिसवार धुमाकूळ घालत आहे. मात्र चित्रपटातील काही डायलॉग्स प्रेक्षकांना खटकले असून त्यावरून सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. ओम राऊत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

चित्रपटातील या संवादांना होत आहे विरोध

1- बजरंग बलीच्या जेव्हा लंकेत जातात, तेव्हा एक राक्षस त्यांना बघतो आणि विचारतो , ”ये लंका क्या तेरी बुआ का बगीचा है, जो हवा खाने चला आया.’

2 – बजरंग बली जेव्हा सीतेला भेटून येतात तेव्हा लंकेतील राक्षस त्यांना पकडतात व त्यांच्या शेपटीला आग लावतात आणि विचारतात जली ? तेव्हा त्या प्रश्नावर उत्तर देताना बजरंग बलीच्याम्हणतात की, ”तेल तेरे बाप का. कपड़ा तेरे बाप का. और जलेगी भी तेरे बाप की.”

3 – या चित्रपटात बजरंग बलीच्या तोंडी असलेला आणखी एक डायलॉग म्हणजे, “जो हमारी बहनों को हाथ लगाएंगे, उनकी लंका लगा देंगे”

4 – युद्धादरम्यान लक्ष्मणावर जेव्हा इंद्रजीत वार करतो, तेव्हा म्हणतो, “मेरे एक सपोले ने तुम्हारे इस शेष नाग को लंबा कर दिया. अभी तो पूरा पिटारा भरा पड़ा है.” याव्यतिरिक्त राम, सीता, हनुमान आणि रावण यांच्या काही संवादांवर आणि वेशभूषेवरही प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे.

चित्रपट बॅन करण्याची होत आहे मागणी

आदिपुरुष चित्रपटाला देशभरातून विरोध होत आहे. हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप चित्रपट निर्मात्यांवर होत आहे. संत समाजही या चित्रपटाविरोधात उघडपणे उतरला असून बंदीची मागणी करत आहे. एवढेच नाही तर भाजपसह सर्वच राजकीय पक्षांचे नेतेही या चित्रपटाला विरोध करत असून त्यावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. यावर केंद्र सरकारकडूनही कडक टीका करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, कोणाच्याही भावना दुखावण्याची परवानगी नाही.

संवाद बदलण्यास निर्माते तयार

सोशल मीडियावरील प्रचंड ट्रोलिंगनंतर अखेर या चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी मोठा निर्णय घेतला आहे. या चित्रपटातील वादग्रस्त डायलॉग्स बदलण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. टी-सीरिजच्या अधिकृत प्रवक्त्याने याबाबतची माहिती दिली आहे. त्याचसोबत संवादलेखक मनोज मुंतशीर यांनीदेखील ट्विट करत डायलॉग्स बदलणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘मी आणि चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शकांनी ठरवलंय की जे संवाद तुम्हाला खटकले आहेत, त्याविषयी आम्ही अभ्यास करू आणि या आठवड्यात सुधारित संवाद चित्रपटात समाविष्ट करू’, असं त्यांनी म्हटलंय. मात्र याच ट्विटमध्ये त्यांनी टीकाकारांवर नाराजी व्यक्त केली आहे.