आता २०२४ या वर्षाला निरोप द्यायला काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यात हे वर्ष आपल्या प्रत्येकाला आनंदाची देणगी देऊन गेलं आहे. या सरत्या वर्षात अनेकांनी चांगल्या वाईट गोष्टीतून काहीतरी शिकून पुढे सरसावले आहेत. पण दुसरीकडे मात्र आपल्याला हसवणारे व आपलं सर्वांचे मनोरंजन करणारे आपली सिनेसृष्टीतील कलाकार जगाच्या पडद्या आड गेले. सिनेसृष्टीत दु:खाचं सावट पसरलेलं होत. या वर्षी अनेक बड्या कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला. या संदर्भात जाणून घेऊया त्या सेलिब्रिटींबद्दल जे २०२४ मध्ये आपल्याला कायमचे सोडून गेले. आपल्या दमदार अभिनयाने चित्रपटसृष्टीचे विश्व गाजवणाऱ्या या कलाकारांना निरोप देताना सगळ्याच रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.
बिहार कोकिळा व्यतिरिक्त बिहार रत्न, मिथिली विभूती सह अनेक पुरस्काराने सन्मानिनत करण्यात आलेल्या व छठ गाण्यांच्या प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. ‘कहे तोसे सजना’ आणि ‘तार बिजली से’ या गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूड आणि लोकसंगीतावर अमिट छाप उमटवली होती.
‘दंगल’ चित्रपटात बबिता फोगटची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर वयाच्या १९ व्या वर्षी हिचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. ती डर्माटोमायोसिटिस नावाच्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त होती. एवढ्या कमी वयात तिच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली होती.
चित्रपट अभिनेते ऋतुराज सिंह यांचे १९ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ऋतुराज सिंह यांनी ५९ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. ‘सत्यमेव जयते २’ आणि ‘जर्सी’ यांसारख्या चित्रपटांचा भाग असलेला ऋतुराज त्याच्या गंभीर आणि प्रभावी अभिनयासाठी कायम स्मरणात राहील.
प्रसिद्ध गायक पंकज उधास यांचे २६ फेब्रुवारी रोजी वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. ‘चिट्टी आई है’ आणि ‘आज फिर तुम पे प्यार आया है’ या गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पंकज उधास यांनी गझल गायनात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. आजही त्यांची गाणी खूप प्रसिद्ध आहेत.
प्रसिद्ध मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेते अतुल परचुरे यांचे १४ ऑक्टोबर रोजी मुंबईत निधन झाले. ‘ऑल द बेस्ट’ आणि ‘खट्टा मीठा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय आणि विनोदी भूमिकांसाठी ओळखले जाणारे अतुल परचुरे त्यांच्या उत्कृष्ट कॉमिक टायमिंगसाठी कायम स्मरणात राहतील.
संगीत दिग्दर्शक आणि हिमेश रेशमियाचे वडील विपिन रेशमिया यांचे 18 सप्टेंबर रोजी वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. ‘इन्साफ की जंग’ आणि ‘तेरा सुरूर’ या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते. २०२४ मध्ये बॉलिवूडने आपली अनेक मौल्यवान रत्ने गमावली. त्यांची कलात्मकता, अभिनय आणि इंडस्ट्रीतील योगदान कायम स्मरणात राहील.