मुंबई : आजपासून दिवाळीला सुरूवात होत आहे. धनत्रयोदशी (Dhanteras Today) हा सर्वात प्रमुख हिंदू सणांपैकी एक आहे, जो देशभरात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. या शुभ दिवशी लोकं विविध धार्मिक कार्यात व्यस्त असतात आणि भगवान कुबेर, भगवान धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात. ते त्यांच्या घराबाहेर दिवे आणि मेणबत्त्या लावतात. दरवर्षी दिवाळीच्या दोन दिवस आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, धनत्रयोदशी हा सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो. यावेळी धनत्रयोदशी आज 10 नोव्हेंबर रोजी साजरी केली जात आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन भांडी, सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणे देखील शुभ मानले जाते.
उदयतिथीनुसार धनत्रयोदशी आज 10 नोव्हेंबरला साजरी केली जात आहे. यावेळी धनत्रयोदशीची त्रयोदशी 10 नोव्हेंबरपासून म्हणजेच आज दुपारी 12.35 वाजता सुरू होत असून ही तिथी 11 नोव्हेंबरला म्हणजेच उद्या दुपारी 1.57 वाजता संपेल.
आज धनत्रयोदशीच्या पूजेची वेळ संध्याकाळी 5:47 ते 7:43 पर्यंत असेल. ज्याचा कालावधी 1 तास 56 मिनिटे असेल. प्रदोष काल- संध्याकाळी 05:30 पासून सुरू होणारा आणि रात्री 08:08 पर्यंत चालू राहील.
अभिजीत मुहूर्त- 10 नोव्हेंबर म्हणजेच आज धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी 11.43 ते 12.26 पर्यंत. हा सर्वात शुभ मुहूर्त आहे.
खरेदीसाठी दुसरी वेळ सकाळी 11:59 ते दुपारी 1:22 पर्यंत आहे.
खरेदीसाठी तिसरा शुभ मुहूर्त आज दुपारी 4.07 ते 5:30 पर्यंत असेल.
धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी उत्तर दिशेला कुबेर आणि धन्वंतरीची स्थापना करावी. त्या दोघांसमोर एक-एक तुपाचा दिवा लावावा. कुबेरांना पेढे आणि धन्वंतरीला पिवळ्या मिष्ठांन्नांचा नैवेद्य दाखवावा. पूजा करताना “ओम ह्रीं कुबेराय नमः” चा जप करा. यानंतर “धन्वंतरी स्तोत्र” पाठ करा. पूजेनंतर धनस्थानावर कुबेर आणि दिवाळीच्या दिवशी धन्वंतरीची प्रतिष्ठापना करा.
धनत्रयोदशीच्या दिवशी दिवे दान केले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी ज्या घरामध्ये यमराजाच्या नावाने दिवा लावला जातो, त्या घरात अकाली मृत्यू होत नाही, असे म्हणतात. धनत्रयोदशीच्या संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर 13 दिवे लावावेत. या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावला जातो. हा दिवा लावण्यासाठी जुन्या दिव्याचा वापर केला जातो. हा दिवा घराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून लावावा. वास्तविक दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. असेही मानले जाते की या दिवशी घरात दिवा लावल्याने सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते.
एका पौराणिक कथेनुसार, कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला समुद्रमंथनातून धन्वंतरी बाहेर पडले तेव्हा त्यांच्या हातात अमृताने भरलेले भांडे होते. भगवान धन्वंतरी कलशांसह प्रकट झाले होते. तेव्हापासून धनत्रयोदशी साजरी होऊ लागली असे म्हणतात. धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी खरेदी करण्याचीही परंपरा आहे. असे मानले जाते की ते नशीब, समृद्धी आणि आरोग्य आणते. धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवता कुबेर यांची विधीपूर्वक पूजा केली जाते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)